हुर्रियतने आयएसआयला दिली गुपिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:34 IST2017-08-02T00:34:15+5:302017-08-02T00:34:19+5:30
हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सईद अली शाह गिलानी यांचे सहकारी देविंदरसिंग बेहल पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील लोकांच्या संपर्कात होते.

हुर्रियतने आयएसआयला दिली गुपिते
नवी दिल्ली : हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सईद अली शाह गिलानी यांचे सहकारी देविंदरसिंग बेहल पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील लोकांच्या संपर्कात होते. त्यांनी भारतीय लष्कराच्या हालचालींसह राष्ट्रीय गुपिते आयएसआयला दिली असावीत, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) मत आहे.
दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपावरून गिलानी यांच्या ठिकाणांवर एनआयएने ३० जुलै रोजी छापे घातले होते. बेहल राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणारी विशिष्ट माहिती आयएसआयला पाठवत होते, असा संशय आहे. त्यांच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम १२१ अंतर्गत दाखल करता येईल, असे एनआयएच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
ते जम्मू आणि काश्मीर सोशल पीस फोरमचे प्रमुख व हुर्रियतचे सदस्य आहेत. बेहल अतिशय जोरदारपणे ‘आझादी’च्या घोषणा देताना व ठार मारल्या गेलेल्या अतिरेक्यांचे बलिदान वाया जावू देऊ नका, असे एका अंत्ययात्रेत आग्रहाने सांगताना यूट्यूबवर दिसते. त्यांच्या मागे पाकिस्तानचा ध्वजही स्पष्ट दिसतो.
बेहल पाच ते सहा वेळा पाकिस्तानला गेले होते. या भेटींचा उद्देश काय हे स्पष्ट झालेले नाही. काश्मिरी बंधुंच्या पाठीशी शीख उभे आहेत असा दावा बेहल उघडपणे करतात. साधे वकील असलेल्या बेहल यांच्या बँक खात्यात ३५ लाख रुपये कसे, याबाबत खुलासा न मिळाल्याने संशय निर्माण झाला आहे.