काँग्रेसच्या छोले भटुऱ्यांमुळे भाजप सावध; उपोषणाआधी नेते, कार्यकर्त्यांसाठी सूचनांची जंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 05:08 PM2018-04-11T17:08:28+5:302018-04-11T17:09:07+5:30
उपोषणाचा फज्जा उडू नये यासाठी भाजप नेते लागले कामाला
नवी दिल्ली: अॅट्रॉसिटीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं होतं. मात्र या उपोषणाआधी काँग्रेस नेते छोले भटुरे खात असल्याची छायाचित्रं समोर आली आणि भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला. आता काँग्रेससारखी नामुष्की आपल्यावर ओढवू नये, यासाठी भाजपचे नेते कामाला लागले आहेत. संसदेच्या अधिवेशनाचा वेळ वाया गेल्यानं भाजपचे खासदार उद्या उपोषण करणार आहेत. मात्र काँग्रेसच्या उपोषणाप्रमाणे आपल्याही उपोषणाचा फज्जा उडू नये, यासाठी भाजपचे नेते सावध झाले आहेत.
काँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उद्या दिल्लीत उपोषण करणार आहेत. या उपोषणाचा फज्जा उडू नये, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व खासदार आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. 'सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळा. उपोषणाला येण्याआधी काही खात असाल, तर त्यावेळी फोटो काढू नका,' अशा सूचना नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे अजय माकन, अरविंदर सिंग लवली आणि हारुन युसूफ उपोषणाआधी छोले भटुरे खात होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर भाजप नेत्यांनी काँग्रेसचं उपोषण म्हणजे स्टंट असल्याची टीका केली होती. त्यामुळेच आता भाजपचे नेते उपोषणाआधी सावध झाले आहेत. भाजपच्या दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी, डॉ. हर्षवर्धन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय खाताना छायाचित्रं काढू नका, अशीही सूचना करण्यात आली आहे. उपोषणस्थळी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बसू देऊ नका, असे आदेशही 'वरुन' देण्यात आले आहेत. उपोषणाचा फज्जा उडू नये, यासाठी भाजपकडून ही काळजी घेण्यात येत आहे.