देशभरात ६,६०६ कोटींचा बिटकॉईन घोटाळा, नितीन गौरला ईडीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 07:42 AM2024-01-04T07:42:30+5:302024-01-04T07:43:07+5:30
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखविणारी योजना मे. व्हेरिएबल टेक. प्रा. लि.ने २०१७ मध्ये राबविली होती.
मुंबई : तब्बल ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा बिटकॉईनचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी नितीन गौर याला ईडीने (सक्तवसुली संचालनालय) दिल्लीतून अटक केली. या कारवाईनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता ६ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखविणारी योजना मे. व्हेरिएबल टेक. प्रा. लि.ने २०१७ मध्ये राबविली होती. अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज यांनी या कंपनीची स्थापना केली होती. नितीन गौर हा कंपनीचा मुख्य संस्थापक अजय भारद्वाज याचा मेहुणा असून, तोदेखील या फसवणूक प्रकरणात सक्रिय सदस्य होता. या योजनेचा प्रसार करण्यासाठी कंपनीने देशभरात अनेक एजंट नेमले होते. यातून गोळा झालेले ६ हजार ६०६ कोटी रुपये विविध मार्गांनी या कंपनीच्या संचालकांनी स्वतःच्या बँक खात्यांमध्ये फिरवत फसवणूक केली. महाराष्ट्र व दिल्ली पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. आतापर्यंतच्या कारवाईत ६९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.