कुणालाही लक्षात ठेवयची इच्छा होणार नाही हे 'जीवघेणं वर्ष' 2020; 'ही' आहेत 5 मोठी कारणं
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 31, 2020 09:05 PM2020-12-31T21:05:15+5:302020-12-31T21:07:42+5:30
एका अदृष्य शत्रूने संपूर्ण जगालाच गुडघे टेकायला भाग पाडले. लाखोंचे बळी घेतले. या अदृष्य शत्रूला पराभूत करण्यासाठी आजूनही प्रयत्न सुरूच आहेत.
नवी दिल्ली - कोरोना महामारीने वर्ष 2020 हे अत्यंत कटू बनवले आहे. यामुळे हे वर्ष लक्षात ठेवायची कुणाचीही इच्छा होणार नाही. एका अदृष्य शत्रूने संपूर्ण जगालाच गुडघे टेकायला भाग पाडले. लाखोंचे बळी घेतले. या अदृष्य शत्रूला पराभूत करण्यासाठी आजूनही प्रयत्न सुरूच आहेत. खरे तर 2020 विसरण्याचे आणखीही अनेक कारणे आहेत, मात्र, या 5 कारणांनी 2020 अत्यंत कटू बनवले.
कोरोनाने लाखो बळी घेतले -
कोरोना महामारीने जगभरात आतापर्यंत 18 लाखहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर 8 कोटींहून अधिक लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. एकट्या भारतातच 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा दीड लाखवर पोहोचला आहे. त्यामुळे, असे जीवघेणे वर्ष कुणाला लक्षात ठेवायची इच्छा होईल?
स्थलांतरीत मजुरांच्या हतबलतेचे दृष्य, आजही डोळ्यात पाणी आणते -
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे अत्यंत हाल झाले. त्यांचे ते दृष्य आजही पाहिले, की डोळ्यात पाणी उभे राहते. त्यावेळचे या मजुरांचे पलायन हे अभूतपूर्व होते. डोक्यावर उन तळपत असताना या मजुरांनी शेकडो किलेमिटरची पायपीट करून आपले घर गाठले. अनेकांचा रस्त्यातच तर अनेकांचा घरी पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. अनेक मजूर तर ट्रक, टँकरमध्ये अक्षरशः जणावरांपेक्षाही वाईट स्थितीत आपल्या खरी पोहोचले. अनेक मजुरांचा अपघातातही मृत्यू झाला.
अर्थव्यवस्था घसरली, लाखो नोकऱ्या गेल्या -
कोरोना महामारीचा फटका केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारतीय अर्थव्यवस्था पहिल्यांदाच मंदीच्या सावटात पोहोचली. यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एवढेच नाही, तर अनेकांच्या वेतनातही कपात झाली. खरे तर अनेकांच्या रोजी रोटीचाच प्रश्न कोरोनाने उभा केला होता. मात्र आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे.
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एदा दंगल -
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर फेब्रुवारी 2020मध्ये पुन्हा एकदा दंगलीचा डाग लागला. नॉर्थ-ईस्ट दिल्लीमध्ये 24 आणि 25 फेब्रुवारीला भीषण सांप्रदायिक दंगे झाले. यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
हाथरस कांड -
ज्या प्रमाणे 2012मध्ये निर्भया सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला होता, अगदी त्याच प्रमाणे 2020 मध्येही हाथरस प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. उत्तर प्रदेशातील हथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला. आरोपींनी तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिला सोडून दिले. नंतर 29 सप्टेंबला दिल्लीतील एका रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. यामुद्द्यावरून देशातील राजकारणही मोठ्या प्रमाणावर तापले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. यानंतर सीबीआयने चार्जशीट दाखल केली आहे.