म्यानमारमधील वांशिक तणावात 400 जणांचे बळी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 02:09 PM2017-09-01T14:09:41+5:302017-09-01T18:32:26+5:30

नैऋत्य म्यानमारमधील रखाईन प्रांतामधील लष्करी कारवाईमुळे बांगलादेशात आश्रय घेण्यासाठी येणाऱ्या 19 रोहिंग्यांचे मृतदेह सापडले आहेत. हे रोहिंग्या लोक नाफ नदीमधून बोटीतून बांगलादेशात येत होते.

400 people killed in ethnic tension in Myanmar | म्यानमारमधील वांशिक तणावात 400 जणांचे बळी ?

म्यानमारमधील वांशिक तणावात 400 जणांचे बळी ?

Next
ठळक मुद्दे2015 साली प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या लष्करी राजवटीला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर तरी लोकशाहीचे वारे म्यानमारमध्ये वाहू शकेल असे वाटत होते. मात्र आजही लष्कराचा ताबा म्यानमारच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर आणि निर्णयावर असल्याचे दिसून येते.

ढाका, दि.1- नैऋत्य म्यानमारमधील रखाईन प्रांतामधील लष्करी कारवाईमुळे बांगलादेशात आश्रय घेण्यासाठी येणाऱ्या 19 रोहिंग्यांचे मृतदेह सापडले आहेत. हे रोहिंग्या लोक नाफ नदीमधून बोटीतून बांगलादेशात येत होते. नाफ नदी ही बांगलादेश आणि म्यानमारमधील नैसर्गिक सीमा आहे. गेली अनेक दशके बांगलादेशातील रखाईन प्रांतातील रोहिंग्या आणि म्यानमारमधील बौद्ध यांच्यामध्ये वांशिक तणाव आहे. 2012 नंतर या तणावाने उग्र स्वरुप धारण केले आहे. या आठवड्यामध्ये झालेल्या लष्करी हल्ल्यामध्ये 400 लोकांचे प्राण गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साधारणतः 38 हजार रोहिंग्यांनी म्यानमारमधून पळ काढून बांगलादेशात जाण्याचा प्रयत्न केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. तर बांगलादेश आणि म्यानामर यांच्यामध्ये असणाऱ्या 'नो मॅन्स लॅंड'मध्ये 20 हजार रोहिंग्या राहात असावेत असा अंदाज आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्यावर चाललेला अनन्वित अन्याय थांबववावा यासाठी नोबेलविजेत्या आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आधीपासूनच दबाव येत आहे मात्र त्यांनी या दबावाला आजवर दाद दिलेली नाही.

2012 साली एका बलात्काराच्या प्रकरणानंतर रोहिंग्यांच्या विरुद्ध रखाईन आणि बौद्ध समुदाय असा तणाव नव्याने निर्माण झाला. रोहिंग्या आमच्या देशात बाहेरून आले आहेत. त्यांचा आमच्या देशाला धोका आहे. ते आपली लोकसंख्या वाढवून आमचा पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशिया- इंडोनेशिया सारखा देश करुन टाकतील अशी भिती म्यानमारचे लोक आणि कट्टर उग्रवादाचे समर्थन करणारे धर्मगुरु उघडपणे बोलू लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ, बलात्कार, गोळीबार आणि हत्येच्या सत्रामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख चाळीस हजार रोहिंग्यांनी बांगलादेश सोडला आहे. काही रोहिंग्यांनी अन्नपाण्याविना साध्या लाकडी बोटींतून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया गाठले. जे जिवंत किनाऱ्याला लागले ते बेकायदेशिररित्या जीव मुठीत धरून आग्नेय आशियामध्ये कसेबसे राहात आहेत. 1990 पासून 4 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात राहण्याचा पर्याय निवडून तिकडे पलायन केले आहे. आजही ते सत्र सुरुच आहे. भारतातही 40 हजार रोहिंग्या राहात असावेत असा अंदाज आहे. त्यातील सर्वाधीक रोहिंग्या जम्मू- काश्मीर राज्यामध्ये राहात आहेत.

शांततेच्या दूताकडून जगाच्या अपेक्षा
आंग सान सू ची या शांततेच्या दूत म्हणून ओळखल्या जायच्या. लष्करी राजवटीविरोधात त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही देण्यात आला. 2015 साली प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या लष्करी राजवटीला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर तरी लोकशाहीचे वारे म्यानमारमध्ये वाहू शकेल असे वाटत होते. मात्र आजही लष्कराचा ताबा म्यानमारच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर आणि निर्णयावर असल्याचे दिसून येते. आंग सान सू ची यांनी रोहिंग्या प्रश्नाबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी आधीच आमचा देशाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे रोहिंग्यांना आम्ही पोसू शकत नाही अशी उघड भूमिका घेतली.

Web Title: 400 people killed in ethnic tension in Myanmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.