महामार्गावर ठिय्या : कचराकुंडीभोवती वावर; भरवस्तीत मस्तवाल वळूंची झुंज
By Admin | Updated: August 20, 2014 00:40 IST2014-08-19T22:49:50+5:302014-08-20T00:40:32+5:30
मनमाड शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद

महामार्गावर ठिय्या : कचराकुंडीभोवती वावर; भरवस्तीत मस्तवाल वळूंची झुंज
गिरीश जोशी ल्ल मनमाड
मनमाड शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरवस्तीत तासन्तास चालणाऱ्या मोकाट जनावरांच्या झुंजीमुळे नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागात वारंवार जनावरांच्या झुंजी सुरू असल्याचे आता नित्याचे झाले आहे.
गेल्या आठवड्यात मध्यवस्तीत रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन मस्तवाल वळूंच्या बेधुंद झुंजीने नागरिकांची एकच धावपळ उडाली, तर मार्गावरील रहदारीस काही वेळ अडथळा निर्माण झाला होता. ऐन दुपारच्या वेळी दोन मस्तवाल वळूंची झुंज सुरू झाली. थोड्याच वेळात रस्त्याच्या मधोमध जागेचा या वळूंनी कब्जा घेतला. या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांनी ही झुंज सोडवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र बेधुंद वळूंवर कुठलाही परिणाम होत नव्हता. भर बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी वळूंच्या झुंजीमुळे नागरिकांची एकच पळापळ सुरू झाली. अखेर काही कालावधीनंतर दोन्ही वळू शांत झाल्यानंतर झुंज सुटली व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोकाट जनावरांचे वास्तव्य असल्याने नेहमीच रहदारीला अडथळा होत असतो, तर पादचाऱ्यांना उपद्रव सहन करावा लागतो. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.