‘समत्वगीतम्’मधून समरसतेचा विचार : इदाते
By Admin | Updated: October 30, 2014 00:06 IST2014-10-30T00:06:47+5:302014-10-30T00:06:47+5:30
‘समत्वगीतम्’मधून समरसतेचा विचार : इदाते

‘समत्वगीतम्’मधून समरसतेचा विचार : इदाते
नाशिक : शंकराचार्य डॉ़ कूर्तकोटी रचित ‘समत्वगीतम्’ या संस्कृत काव्य पुस्तकात श्रीमद् भगवद्गीतेतील निवडक ३६१ श्लोकांच्या निरूपण असून, त्यांनी त्यातून समता व समरसता हे प्रमुख विचार मांडले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता मंचचे अखिल भारतीय संयोजक भिकूजी इदाते यांनी केले़ गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलमध्ये स्व़ डॉ़ म़ बा़ कुलकर्णी यांनी केलेल्या मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते़
इदाते पुढे म्हणाले की, शंकराचार्यांनी जेव्हा या काव्याची रचना केली तो काळ हा करवट बदलण्याचा कालखंड होता़ देशाला जगातील सर्वश्रेष्ठ देश बनवायचे असेल तर परंपरा व चिंतन महत्त्वाचे असून, अनेक संकटे आपण याद्वारे परतवून लावली आहेत़ त्या-त्या कालावधीत झालेल्या महापुरुषांनी समाजाला प्रेरणा दिली़ शंकराचार्यांच्या या पुस्तकातून समत्व, समता आणि समरसता हे गुण पुढे येतात़ याबरोबरच धर्मातील मंत्र व श्लोक याचा अर्थ समरसतेतून शंकराचार्यांनी मांडल्याचे ते म्हणाले़
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरूपद स्वीकारण्याची पंडित मदनमोहन मालवीय यांनी घातलेली गळ, पं़ मोतीलाल नेहरूंची होमरूल चळवळीला आशीर्वाद देण्याची विनंती, लोकमान्य टिळकांनी नाशिक हे कार्यक्षेत्र करण्याची दाखविलेली दिशा, काळाराम मंदिर सत्याग्रहात डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले समर्थन, स्वातंत्र्यसेनानी डॉ़ मुंजे, स्वातंत्र्यवीर सावरकर, ऩ चिं़ केळकर यांच्यासोबत शंकराचार्यांचा असलेला संपर्क, सहवास यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते़
शंकराचार्यांचे या पुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी इंग्रजी भाषेत झाले, तर यावर्षी १३५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मराठी भाषेत झाले आहे़ स्व़ डॉ़ म़ बा़ कुलकर्णी यांनी केलेल्या मराठी भाषांतरात शंकराचार्यांचा समत्वभाव लोकांसमोर आला आहे़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मोगल यांनी, तर सूत्रसंचालन देवीदास जोशी यांनी केले़ (प्रतिनिधी)