नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:18 IST2018-01-15T22:17:01+5:302018-01-15T22:18:25+5:30
नाशिक : शासकीय शाळेच्या मैदानात खेळत असलेल्या आठवर्षीय मुलीस शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास घडली़

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन
नाशिक : शासकीय शाळेच्या मैदानात खेळत असलेल्या आठवर्षीय मुलीस शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील एका शासकीय शाळेस संक्रांतीची सुटी असल्याने परिसरातील काही मुले व आठ वर्षीय मुलगी मैदानात खेळत होती़ त्यावेळी संशयित सुनील शर्मा (ठाणे) हा तिथे आला व त्याने आपली कार शाळेच्या प्रवेशद्वारावर पार्क केली़ यानंतर मैदानात खेळत असलेल्या आठवर्षीय मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून बाथरूममध्ये घेऊन गेला़
बराच कालावधी होऊनही कारचालक स्वच्छतागृहाबाहेर न आल्याने सुरक्षारक्षकाने धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला़ शाळेच्या सुरक्षारक्षकाने आरडाओरड केली असता संशयित शर्मा फरार झाला़ या घटनेची माहिती मिळताच निरीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक सोनवणे व महिला सहायक पोलीस निरीक्षक एम. व्ही. घोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगासह लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.