हवामान बदलाचा फटका : रखरखत्या उन्हातही कांदा काढणीच्या कामांना वेग कांदा उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:11 IST2018-04-02T00:11:29+5:302018-04-02T00:11:29+5:30
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाचे लाल सोने काढण्यासाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहे.

हवामान बदलाचा फटका : रखरखत्या उन्हातही कांदा काढणीच्या कामांना वेग कांदा उत्पादनात घट
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाचे लाल सोने काढण्यासाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने तपमानात मोठी वाढ झाला आहे. तपमानाने जवळपास चाळिशीचा आकडा गाठल्याचे ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. या जीवघेण्या उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन तापू लागले आहे. रात्री थंडी, तर दिवसा कडक ऊन असल्याने उकाडा चांगलाच जाणवत आहे. तालुक्यातील वटार, डोंगरेज, चौंधाणे, कंधाणे, विंचुरे आदी परिसरातील शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने नदी, नाले, विहिरी, कुपनलिकांना बºयापैकी पाणी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र कांद्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे नागरिकांना दुपारच्या वेळेत घराच्या बाहेर पडू नये असे सांगितले जात असताना दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग चार पैसे मिळावे यासाठी उन्हाच्या झळा सोसत कष्ट करताना दिसतोय. दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता तुलनेने अधिक जाणवत असून, तापलेली जमीन व त्यातून निघणाºया तप्त झळा शेतात काम करणाºया महिला व पुरुषांना चांगलेच चटके देऊन जात आहेत. ज्या शेतकºयांकडे चाळी नाही ते काढणीस आलेला कांदा उन्हाच्या झळांनी सुकून खराब होऊ नये म्हणून कांद्याची पात व उसाच्या पाचटाच्या सहायाने कांद्याचा बचाव करताना दिसत आहे. तर ज्या शेतकºयांकडे चाळी आहेत ते चाळीत साठवणूक करतानाचे चित्र आहे. उन्हामुळे कांदा सडू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेताना प्रत्येक शेतकरी दिसत आहे. उन्हाच्या तीव्रतेत एवढी वाढ झाली आहे की सकाळी पिकांना पाणी भरलेले असले तरी रात्री जमीन कोरडी पडलेली दिसून येते. पिके सुकू लागली आहेत. भर उन्हात काम करावे लागत असल्याने शेतकरी, मजूरवर्ग संरक्षणासाठी टोप्या, उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.