नाशिकचे कमाल-किमान तपमान वाढल्याने थंडी गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:16 IST2018-02-05T21:12:33+5:302018-02-05T21:16:12+5:30
फेबु्वारी महिना उजाडल्यापासून शहराच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. एक तारखेपासून कमाल तपमानाबरोबर किमान तपमानाचा पाराही चढता राहिल्यामुळे शहरातून थंडीची तीव्रता कमी होऊ लागली.

नाशिकचे कमाल-किमान तपमान वाढल्याने थंडी गायब !
नाशिक : मागील तीन दिवसांपासून कमाल-किमान तपमानाचा पारा वाढू लागल्याने शहरामधून थंडी हळूहळू गायब होत असल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे. सोबत उन्हाचा चटकाही जाणवू लागला आहे. सोमवारी कमाल तपमान ३२.७, तर किमान तपमान १२.२ इतके नोंदविले गेले.
फेबु्वारी महिना उजाडल्यापासून शहराच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. एक तारखेपासून कमाल तपमानाबरोबर किमान तपमानाचा पाराही चढता राहिल्यामुळे शहरातून थंडीची तीव्रता कमी होऊ लागली. दोन दिवसांपर्यंत रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत होता; मात्र कमाल तपमानासह किमान तपमानही १२ अंशांपर्यंत वाढल्यामुळे रात्रीदेखील थंडीची तीव्रता दोन दिवसांपासून जाणवत नाही. एकूणच थंडीने शहरातून काढता पाय घेतल्याची स्थिती आहे. शुक्रवारी (दि.२) कमाल तपमान ३२ अंशांपर्यंत, तर किमान तपमान १०.६ अंश इतके नोंदविले गेले होते. शनिवारी कमाल तपमान ०२ अंशांनी, तर किमान तपमानात एक अंशाने वाढ झाली. सोमवारी मात्र किमान तपमान थेट १२ अंशांच्या पुढे गेले, तर कमाल तपमानाचा पारा जवळपास ३३ अंशांपर्यंत सरकला. यामुळे सोमवारी थंडी पहाटे व रात्री अत्यल्प स्वरूपात जाणवली. एकूणच थंडीची तीव्रता कमी झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडा थंडीने चांगलाच गाजवला. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला होता. सर्दी-पडसे, खोकल्याचे रुग्ण वाढले होते.