धक्कादायक ! कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःच सरण रचून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 16:39 IST2018-11-10T16:23:18+5:302018-11-10T16:39:05+5:30
पोतन्ना रामन्ना बलपीलवाड (65) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःच सरण रचून केली आत्महत्या
उमरी (नांदेड ) : कर्ज आणि सततच्या नापिकीस कंटाळून एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.९ ) सायंकाळी उघडकीस आली. पोतन्ना रामन्ना बलपीलवाड (65) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तेलंगणा राज्याच्या सीमेवरील तालुक्यातील तुराटी या गावी पोतन्ना रामन्ना बलपीलवाड यांची गाव शिवारात शेत जमीन आहे. दुष्काळामुळे शेतात नापिकी आणि डोक्यावरील कर्ज यास ते कंटाळले होते. यातूनच शुक्रवारी दुपारी ते शेतात गेले व सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःच सरण रचून आत्महत्या केली. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे २ लाख व जिल्हा सहकारी बँकेचे ४० हजार असे एकूण २ लाख ४० हजारांचे कर्ज होते. वारकरी संप्रदायाचे अनुकरण करणारे पोतन्ना यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व पाच विवाहित मुली आहेत. विशेष म्हणजे पाचही मुली माहेरी आलेल्या आहेत.
राहिली फक्त राख आणि हाडे
खूप वेळ झाला तर पोतन्ना परत आले नसल्याने मुलगा व पुतण्या त्यांच्या शोधात शेतात आले. यावेळी निखाऱ्यावर पसरलेली राख आणि हाडे पाहून त्यांना धक्का बसला. घटनेची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाची पूर्णपणे राख व कोळसा झाल्याने अधिकारी डॉक्टर नारायण कस्तुरे यांनी घटनास्थळावरील जळालेल्या मृतदेहाचे नमुने घेतले.