गॅस कटरने एटीएम कापून रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:01 IST2017-11-01T10:55:53+5:302017-11-01T11:01:26+5:30
बेसा-घोगली मार्गावरील युको बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ३ लाख १० हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाला जबर हादरा बसला.

गॅस कटरने एटीएम कापून रोकड लंपास
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बेसा-घोगली मार्गावरील युको बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ३ लाख १० हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाला जबर हादरा बसला.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेसा परिसरात हे एटीएम आहे. सीसीटीव्हीशिवाय सुरक्षेचे दुसरे कोणतेही उपाय येथे नाही. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीनंतर लुटारू एटीएमजवळ आले. आपले चौर्यकर्म उघडकीस येऊ नये म्हणून एक लुटारू एटीएमच्या आत शिरला. त्याने विशिष्ट प्रकारचा स्प्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला. त्यानंतर तो आणि त्याच्या साथीदारांनी एटीमच्या शटरचे कुलूप तोडून ते परत लावून घेतले. एटीएमला गॅस कटरने कापून त्यांनी लॉकरच्या विविध कप्प्यातील ३ लाख १० हजार ६०० रुपयांची रोकड ताब्यात घेतली आणि पळून गेले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास एक ग्राहक रक्कम काढण्यासाठी आतमध्ये गेला तेव्हा त्याच्या लक्षात चोरीचा प्रकार आला. त्याने लगेच बँक आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर बँकेचे अधिकारी तसेच हुडकेश्वरमधील पोलीस ताफा एटीएमजवळ पोहचला. त्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर तपासला असता स्प्रे मारण्यासाठी आलेला एकच लुटारू त्यात दिसला. त्यानंतर बँक व्यवस्थापक सनीप्रकाश प्रदीपकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हवालदार गौतम बोरकर यांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.
४३ हजार शिल्लक
एटीएमच्या लॉकरमधील विविध कप्प्यात एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपये होते. त्यापैकी ४३ हजारांची रक्कम लॉकरच्या दुसऱ्या एका कप्प्यात अडकून राहिली. ती लुटारूंच्या नजरेत पडली नाही. त्यामुळे ती शिल्लक राहिली. विशेष म्हणजे, गॅस कटरने एटीएमचे लॉकर कापून यापूर्वीही रक्कम लंपास करण्यात आल्याचे गुन्हे नागपुरात घडले. मात्र, बँकांकडून त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आता पुन्हा ही घटना घडली. असे गुन्हे करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीचा या गुन्ह्यात समावेश असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.