स्मार्ट सिटी नागपूरसाठी कोरियासोबत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:27 IST2017-11-17T01:27:05+5:302017-11-17T01:27:19+5:30
नागपूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी आज कोरियन शासनाच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

स्मार्ट सिटी नागपूरसाठी कोरियासोबत करार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी आज कोरियन शासनाच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
कोरिया सरकारच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशनच्यावतीने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष पार्क संग वू आणि नागपूर महानगरपालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त अश्विन मुद्गल यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनावणे, कोरियन कंपनीचे कुम स्वाँग उन, ली जुंग वूक आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोरियाबरोबर विश्वासार्ह भागीदारी होत आहे.
नागपूर शहराच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे. यामुळे नागपूर शहराचे रूप बदलणार आहे. तसेच करारामुळे स्मार्ट नागपूरचे काम जलद गतीने आणि लवकरात लवकर सुरू होऊन वेळेत पूर्ण करण्यात येईल. स्मार्ट सिटी प्रकल्पात कोरियाचे शासन गांभीर्याने लक्ष घालत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पुढील काळात आणखी भागीदारी कोरियाबरोबर करण्यात येणार आहे. यावेळी संग वू म्हणाले, कोरिया आणि भारत यांच्यात चांगले संबंध आहेत. या करारामुळे हे नाते दृढ होणार आहे. स्मार्ट सिटीसाठी आम्ही उत्तम काम करू. यासाठी मुंबईत एक संयुक्त कार्यालय लवकरच सुरू करू, असेही त्यांनी सांगितले.
या करारानुसार स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीचे धोरण निश्चित करणे, तंत्रज्ञानाचा वापर, विकास क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान तसेच स्मार्ट सिटीच्या देखभाल व दुरुस्ती, नागरिकाभिमुख प्रशासन व निधीचा पुरेपूर वापर करणे, वाहतुकीच्या विविध साधनांचा प्रभावी वापर, निधीची उपलब्धता करणे आणि पायाभूत व सेवा क्षेत्राचा विकासासाठी विविध मार्गांचा वापर आदी क्षेत्रात परस्पर सहकार्याने कामे करण्यात येणार आहेत.