VIDEO- ग्रामपंचायतीच्या इमारतीत चालणारे असेही प्राथमिक आरोग्य केंद्र
By Admin | Updated: January 31, 2017 18:08 IST2017-01-31T18:08:16+5:302017-01-31T18:08:16+5:30
वाशिम तालुक्यातील वारला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यांमध्ये सुरू आहे.

VIDEO- ग्रामपंचायतीच्या इमारतीत चालणारे असेही प्राथमिक आरोग्य केंद्र
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 31 - स्वतंत्र जागा व इमारत उपलब्ध नसल्याने वाशिम तालुक्यातील वारला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यांमध्ये सुरू आहे. साधारणत: आठ वर्षांपूर्वी अनसिंग येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने अनसिंगचे प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून या आरोग्य केंद्राला स्वतंत्र जागा उपलब्ध होऊ शकली नाही. ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यांमध्ये आरोग्य केंद्र थाटले असून, भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो.
या आरोग्य केंद्रांतर्गत अनसिंग १, अनसिंग २, वारला, उकळीपेन, सावळी, बाभुळगाव, उमरा (शम.), पिंपळगाव असे आठ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांमध्ये ३९ गाव अंतर्भूत असून, या एकूण गावातील लोकसंख्या ७० हजारांच्या वर आहे. या आरोग्य केंद्राला स्वतंत्र इमारत नसल्यामुळे आवश्यक ती उपकरणे नाहीत. कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांनादेखील निवासस्थानाची व्यवस्था नाही. समस्येच्या गर्तेत अडकलेल्या या आरोग्य केंद्राकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच एक जागा निश्चित करून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर इमारतीचे बांधकाम केले जाईल, असे डॉ. सेलोकर यांनी सांगितले.