'जन गण मन' ऐवजी 'वंदे मातरम' बनावे राष्ट्रगीत - भय्याजी जोशी
By Admin | Updated: April 2, 2016 09:50 IST2016-04-02T09:46:41+5:302016-04-02T09:50:18+5:30
जन गण मन' ऐवजी ' वंदे मातरम' हे राष्ट्रगीत असावे,अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मांडली.

'जन गण मन' ऐवजी 'वंदे मातरम' बनावे राष्ट्रगीत - भय्याजी जोशी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - ' भारत माता की जय' घोषणेच्या मुद्यावरून देशभरात वाद उफाळलेला असतानाच ' जन गण मन' ऐवजी ' वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत असावे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मांडल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तसेच 'भगवा ध्वज हा देशाचा राष्ट्रध्वज बनावा' असेही त्यांनी म्हटले. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते.
आजकाल आपल्या देशात 'भारत माता की जय' म्हणायला शिकवावं लागतं ही संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेली खंत व त्यानंतर गळ्यावर सुरू ठेवली तरी ' भारत माता की जय' म्हणणार नाही, संविधानात असं सांगितलेलं नाही, अशी भूमिका एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मांडली होती. त्यानंतर देशभरात या मुद्यावरून वाद निर्माण झाला, अनेकांनी ओवेसींच्या वक्तव्याचा निषेध केला. हा वाद अद्याप शमलेला नसतानाच सरकार्यवाह भय्याजी जोशींनी नवे विधान केले आहे.
‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गाताना देशप्रेमाच्या भावना तेवढय़ा उचंबळून येत नाहीत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ हेच राष्ट्रगीत का होऊ नये, असा सवाल जोशी यांनी विचारला. तसेच राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याची निवड नंतर झाली, परंतु भगवा ध्वज त्याआधीपासून अस्तित्वात आहे, त्यामुळे भगव्याला राष्ट्रध्वज मानणे गैर ठरणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.