शरद पवार हे कला क्षेत्राविषयी जिज्ञासा असणारे नेते
By Admin | Updated: December 14, 2015 02:29 IST2015-12-14T02:29:36+5:302015-12-14T02:29:36+5:30
‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा प्रयोग असो की, सिंहासन चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुद्दा. प्रत्येक वेळी शरद पवार यांनी घेतलेले साहसी निर्णय

शरद पवार हे कला क्षेत्राविषयी जिज्ञासा असणारे नेते
पुणे : ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा प्रयोग असो की, सिंहासन चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुद्दा. प्रत्येक वेळी शरद पवार यांनी घेतलेले साहसी निर्णय आणि कला, साहित्य, विज्ञान, कृषी यांसह प्रत्येक विषयात असलेली त्यांची रुची व त्याबद्दल जाणून घेण्याची त्यांची चिकित्सक वृत्ती यातून त्यांचा जिज्ञासूपणा दिसतो. त्यामुळे शरद पवार लोकनेते म्हणून भावतात, अशा भावना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी रविवारी येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटचे यशवंतराव चव्हाण लोकनेतृत्व अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शरद व्याख्यानमालेचा रविवारी प्रारंभ झाला. त्यात ‘शरद पवार यांचे सिनेमा व कला क्षेत्रातील योगदान’ या विषयावर डॉ. पटेल बोलत होते. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
‘विज्ञान-तंत्रज्ञान आणि शरद पवार’ या विषयावर बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले, देशाच्या विकासात विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून निर्णय घेणारे नेते म्हणून मी शरद पवार यांच्याकडे पाहतो. कृषीमंत्री असताना शेतीविषयक संशोधनावर त्यांनी भर दिला. संरक्षणमंत्री असताना डीआरडीओ आणि इतर संशोधन संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
सुनील तटकरे म्हणाले, विद्यार्थी चळवळींतून शरद पवार यांचे नेतृत्त्व विकसित होत गेले. पुढे त्यांनी राजकारणातील नव्या पिढीला घडविण्याचेही काम केले.
देशातील प्रत्येक समस्येची पवार यांना अचूक जाण आहे. अगदी बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेवण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा आग्रह धरून त्यांनी ते करून दाखवले, असे माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)