पल्लवी हत्याप्रकरण, सुरक्षारक्षक सज्जाद पठाण दोषी
By Admin | Updated: June 30, 2014 13:04 IST2014-06-30T12:11:36+5:302014-06-30T13:04:50+5:30
मुंबईतील पल्लवी पुरकायस्थ या वकिल तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने सुरक्षा रक्षक सज्जाद पठाणला दोषी ठरवले आहे. पठाणला ३ जूलैरोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

पल्लवी हत्याप्रकरण, सुरक्षारक्षक सज्जाद पठाण दोषी
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३०- मुंबईतील पल्लवी पुरकायस्थ या वकिल तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने सुरक्षा रक्षक सज्जाद पठाणला दोषी ठरवले आहे. पठाणला ३ जूलैरोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईतील वडाळा परिसरातील हिमालयन हाईट्स या सोसायटीत राहणा-या पल्लवी पुरकायस्थ या तरुणीची राहत्या घरी हत्या झाली होती. पल्लवीची तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन हत्या केल्याचे उघड झाले होते. पल्लवी ही एका खासगी कंपनीत वकिल म्हणून कार्यरत होती. पल्लवी एका वकिल तरुणासोबत हिमालयन हाईट्समध्ये लीव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. सुरुवातीला या प्रकरणात पल्लवीच्या परिचयातील व्यक्तींचा या हत्येत हात असण्याचा कयास होता. मात्र पोलिस तपासात पल्लवीची हत्या इमारतीचा सुरक्षारक्षक सज्जाद पठाणने केल्याचे समोर आले. सज्जादची पल्लवीवर नजर होती. ९ ऑगस्ट रोजी पल्लवी घरात एकटी असताना सज्जादने तिच्या घरात प्रवेश केला. यानंतर त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र पल्लवीने विरोध दर्शवल्यावर सज्जादने तिची हत्या केली होती.
याप्रकरणावर सोमवारी मुंबई सेशन्स कोर्टाने निकाल दिला. कोर्टाने सज्जादला बलात्काराचा प्रयत्न, हत्या या कलमांतर्गत दोषी ठरवले असून शिक्षेची सुनावणी ३ जूलै रोजी होणार आहे. या खटल्यात सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. सज्जादला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पल्लवीच्या आईने केली आहे.