काँग्रेसने बदलला चंद्रपूरचा उमेदवार; सुरेश धानोरकर यांना दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:45 AM2019-03-25T05:45:40+5:302019-03-25T05:46:51+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्टÑातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे.

Chandrapur candidate changed Congress; Suresh Dhanorkar gave his candidacy | काँग्रेसने बदलला चंद्रपूरचा उमेदवार; सुरेश धानोरकर यांना दिली उमेदवारी

काँग्रेसने बदलला चंद्रपूरचा उमेदवार; सुरेश धानोरकर यांना दिली उमेदवारी

googlenewsNext

दिल्ली/मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्टÑातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव सातव यांच्याऐवजी सुभाष वानखेडे यांना पक्षाने मैदानात उतरविले. भंडारा-गोंदियामधून भाजपाने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली असून राष्टÑवादीने माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम व मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाचे चित्र अस्पष्ट आहे.
काँग्रेसने रविवारी देशभरातील दहा उमेदवारांची नावे सायंकाळी जाहीर केली. त्यात महाराष्टÑातील सुभाष वानखेडे (हिंगोली), हिदायत पटेल (अकोला), किशोर गजभिये (रामटेक) आणि सुरेश धानोरकर (चंद्रपूर) या चार नावांचा समावेश आहे. रामटेक मतदारसंघातूनही मुकुल वासनिक यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर सेवानिवृत्त सनदी अधिक किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राज्यात मोठे वादळ निर्माण झाले होते. चंद्रपूर येथून पहिल्यांदा काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी दिली होती. अनेकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने मुत्तेमवार यांनीच स्वत:च उमेदवारी मागे घेतली. शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी राजीनामा देऊन काँग्रेसची उमेदवारी घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अचानक विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने वाद निर्माण झाला. बांगडे यांना उमेदवारी जाहीर होताच एका कार्यकर्त्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण व्हायरल केले. स्थानिक नेत्यांचा विरोध आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे काँग्रेसने बांगडे यांच्याऐवजी सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या रविवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: हस्तक्षेप करून सुरेश धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

हिंगोलीत आजी-माजी शिवसैनिकांत लढत
हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेने नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने आज शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथे दोन आजी-माजी शिवसैनिकांत लढत होणार आहे. हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्याकडे गुजरात राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी असल्यामुळे सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसकडून हिदायत पटेल;आता आंबेडकरांकडे लक्ष!
अकोला लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्याबाबत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला काथ्याकूट अखेर संपला असून, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवून वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची कोंडी करण्याची खेळी काँग्रेसने खेळली आहे.

खासदार पुत्राची नगरमध्ये बंडखोरी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कापला गेला. त्यामुळे गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. गांधी यांच्या बंडखोरीमुळे अहमदनगर मतदारसंघात भाजपमध्ये दुफळीची शक्यता आहे.

कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी
काँग्रेसने आणखी दहा उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांना तामिळनाडूतील शिवगंगा येथून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
या उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील चार, बिहारमधील तीन, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत कार्ती यांचा शिवगंगा मतदारसंघामध्येच पराभव झाला होता.

चार मतदारसंघांचा तिढा कायम
राज्यातील चार मतदारसंघ वगळता जवळपास सर्व मतदारसंघांतील
लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने २१ उमेदवार घोषित केले असून मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर-पश्चिम या दोन मतदारसंघांतील उमेदवार बाकी आहेत. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे
उत्तर-पश्चिममधून इच्छुक आहेत. तर भाजपाने खा. किरीट सोमय्या
यांच्या मुंबई उत्तर-पूर्वमधून उमेदवार जाहीर केलेला नाही. पालघर मतदारसंघ शिवसेना लढविणार की भाजपा, हा संभ्रम कायम आहे.

प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून यापुढे कोणत्याही राजकारणात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. पक्ष़ाने सांगलीतून बंधू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर ठीक नाही तर ते अपक्ष लढतील, असेही त्यांनी जाहीर केले.

Web Title: Chandrapur candidate changed Congress; Suresh Dhanorkar gave his candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.