Budget 2020: कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प : राणा जगजितसिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 12:04 PM2020-02-02T12:04:16+5:302020-02-02T12:04:32+5:30
कृषी क्षेत्रासाठी १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून भरीव तरतूद करून विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
उस्मानाबाद : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेला अर्थसंकल्प ऐतिहासिक असा आहे. या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य, उर्जा आदी क्षेत्रांसाह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
कृषी क्षेत्रासाठी १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून भरीव तरतूद करून विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शेतीसाठी पतपुरवठा पाच वर्षात दुप्पट म्हणजे ७ लाख कोटीवरून १५ लाख कोटी रूपयांपर्यंत नेला आहे. हा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा आहे. 'पीपीपी योजनेतून देशातील उस्मानाबादसह ११२ मागास जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा अनेक वर्षापासूनच प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्सटाईल मिशनची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटन विकासासाठी या अर्थसंकल्पात योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही आमदार पाटील म्हणाले.