स्मशानभूमी नसल्याने तोंडारमध्ये ग्रामपंचायतीसमोरच रचले सरण
By Admin | Updated: March 27, 2017 19:33 IST2017-03-27T19:33:14+5:302017-03-27T19:33:14+5:30
उदगीर तालुक्यातील तोंडार येथे इतर मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने सोमवारी वाद उद्भवला.

स्मशानभूमी नसल्याने तोंडारमध्ये ग्रामपंचायतीसमोरच रचले सरण
ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. 27 - उदगीर तालुक्यातील तोंडार येथे इतर मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने सोमवारी वाद उद्भवला. येथील सरपंचाच्या सासऱ्याचे निधन झाले. मात्र, स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीपुढेच अंत्यविधी करण्याचा निर्णय समाजाने घेतला. त्यावरून गावात तणाव निर्माण झाला होता.
तोंडार येथील सरपंच छाया लासुरे यांचे सासरे सीताराम लासुरे (६८) यांचे रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते गुरव समाजातील आहेत. तोंडार येथे गुरव समाजासह इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांसाठी स्मशानभूमीत जागा उपलब्ध नाही. त्यामुळे आतापर्यंत गावातील रस्त्याशेजारीच अंत्यविधी उरकण्यात येत होते. मात्र, यावेळी स्मशानभूमीत जागा दिल्याशिवाय अंत्यविधी करायचा नाही किंवा तो ग्रामपंचायतीपुढेच करायचा, असा निर्धार समाजातील नागरिकांनी केला.
यादरम्यान, सरपंच छाया लासुरे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन स्मशानभूमीत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तहसीलदार राजश्री मोरे यांनी तोंडारला भेट देऊन जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देताना तात्पुरता अंत्यविधी करण्यासाठी एक जागा ठरवून दिली़. परंतु काही वेळाने गावातील अन्य काही नागरिकांनी या जागेवर अंत्यविधी करू न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे लासुरे यांचा अंत्यविधी ग्रामपंचायतीपुढेच करण्याच्या अनुषंगाने दुपारी कार्यालयासमोर लाकडे आणून टाकण्यात आली. तेव्हा वातावरणातील तणाव वाढल्याने सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलिसांची अतिरिक्त कुमक तोंडारला पाठविण्यात आली. तसेच तहसीलदार राजश्री मोरे व गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी पुन्हा सायंकाळी ग्रामस्थांची बैठक घेतली. माजी आमदार मनोहर पटवारी यांनीही ग्रामस्थांची समजूत काढण्यात पुढाकार घेतला होता.