Maratha Reservation : कोल्हापूर : मानवी साखळीने मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:12 IST2018-08-06T15:09:33+5:302018-08-06T15:12:39+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील तालीम, मंडळांनी मिरजकर तिकटी येथे मानवी साखळी करुन आरक्षणाचा आवाज बुलंद केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी मिरजकर तिकटी येथे मंगळवार पेठेतील तालीम, मंडळांनी मानवी साखळी आंदोलन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील तालीम, मंडळांनी मिरजकर तिकटी येथे मानवी साखळी करुन आरक्षणाचा आवाज बुलंद केला. सुमारे तासभर हे रास्ता रोको आंदोलन सुरु राहील्याने वाहतुक ठप्प झाली. यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरुन वळविण्यात आली. आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करु नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता मंगळवार पेठेतील तालीम, मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मिरजकर तिकटी येथे एकवटले. काही वेळातच कार्यकर्त्यांनी हातात हात घालून हुतात्मा स्तंभाभोवती मानवी साखळी तयार केली.
यावेळी हलगी घुमक्याचा गजर आणि ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. जवळपास तासभर हे आंदोलन सुरु होते. यामुळे मिरजकर तिकटीकडे नंगीवली चौक, बिनखांबी, देवल क्लब आदी मार्गावरुन येणारी वाहतुक ठप्प होऊन कोंडी झाली. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गावरुन वळविली.
यावेळी सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करु नये असे आवाहन आंदोलकांनी केले.
आंदोलनात बाबूराव चव्हाण, बाबा पार्टे, विजय देवणे, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, अजित सासने, रमेश मोरे, प्रसाद जाधव, आदील फरास, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, राजेश पार्टे, उमेश पोवार, राजू जाधव, किरण जाधव, निवास शिंदे, किशोर घाटगे, दादा लाड, राजू चव्हाण, स्वप्निल पार्टे, बाळासाहेब पाटील, युवराज पाटील, चारुलता चव्हाण, गायत्री राऊत, राहुल चव्हाण, शिवाजी ढवाण, सचिन मंत्री आदींसह तालीम, मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.