कुरुंदवाड : Ganpati Festival मजरेवाडीत हिंदू बांधवांकडून मशिदीची उभारणी : गावामध्ये एकही मुस्लिम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:59 IST2018-09-19T23:54:14+5:302018-09-19T23:59:51+5:30
राज्यात, देशात दररोज जातीयवादाच्या घटना घडत असतात. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात घडत असतात. गणेशोत्सव, मोहरम काळात अशा घटना अधिक घडत असतात. यातून काही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजतात. मात्र,

कुरुंदवाड : Ganpati Festival मजरेवाडीत हिंदू बांधवांकडून मशिदीची उभारणी : गावामध्ये एकही मुस्लिम नाही
गणपती कोळी ।
कुरुंदवाड : राज्यात, देशात दररोज जातीयवादाच्या घटना घडत असतात. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात घडत असतात. गणेशोत्सव, मोहरम काळात अशा घटना अधिक घडत असतात. यातून काही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजतात. मात्र, या सर्व प्रकाराला मजरेवाडी (ता. शिरोळ) गावाने मूठमाती दिली आहे. गावामध्ये एकही मुस्लिम नाही, तरीही हिंदू बांधवांनी एकत्र येऊन गावामध्ये मशीद उभारली आहे.
मशिदीत गणपती बसविणे, पीर पंजा बसविणे, मुस्लिम धर्माप्रमाणे पूजाअर्चा करण्याचे सर्व काम हिंदू लोक भक्तिभावाने करतात. त्यामुळे या गावाचा आदर्श देशबांधवांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
शहरापासून तीन कि़ मी. अंतरावर दक्षिणेस असलेले मजरेवाडी गाव अवघ्या चार ते पाच हजार लोकवस्तीचे. सर्वच समाजासह बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. मात्र, या गावामध्ये पूर्वीपासूनच मुस्लिम समाजाचे एकही घर नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात कुरुंदवाडच्या पटवर्धन संस्थानिकांच्या अधिपत्याखाली हे गाव होते. गावात शेकडो वर्षांपासून मशीद होती. या मशिदीत पटवर्धन संस्थानिकांचा सरकारी पीर पंजा मोहरम काळात बसविला जात असतो. याची सर्व व्यवस्था संस्थानकाळात संस्थानिक पाहत होते.
स्वातंत्र्यांनतर संस्थाने खालसा झाली. या मशिदीकडे मुस्लिम समाजच नव्हे, तर पटवर्धन संस्थानिकांच्या वारसांचेही दुर्लक्ष झाले. मात्र, या मशिदीबाबत व पिराविषयी ग्रामस्थांची श्रद्धा कधी कमी झाली नाही. मशिदीच्या पडझडीमुळे गावातील हिंदू बांधवांनी शासकीय निधीची वाट न पाहता वर्गणी काढून चार वर्षांपूर्वी आठ लाख रुपये खर्च करून मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार नव्याने मशीद बांधून मुस्लिम धर्माचा आदर केला आहे.
प्रत्येक गुरुवारी मशिदीमध्ये पूजाअर्चा केली जाते. मशिदीचे पुजारी हे मुस्लिम समाजातील लागत असल्याने पूजाअर्चाचे काम कुरुंदवाडमधील दस्तगीर हसन मुल्ला पाहत आहेत. गावातील महत्त्वाच्या बैठका, निर्णय, चर्चासत्र या मशिदीमध्येच बसून ग्रामस्थ घेत असतात. एकीकडे नवीन पिढी जातीयवादाकडे अधिक आकर्षिली जात असताना या गावातील तरुण पिढीने मात्र पूर्वजांच्या प्रथेनुसार मशिदीची धार्मिक परंपरा कायम राखली आहे. या मशिदीत प्रत्येकवर्षी ग्रामस्थ गणेशाची प्रतिष्ठापना करतात. पीर पंजाही बसवून सर्व विधिवत कार्यक्रम होतात. त्यामुळे ग्रामस्थांनी मुस्लिम धर्माचा केलेला आदर जातीयवादाचे लोण पसरविणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
या मशीद नियोजन समितीचे अध्यक्ष बापूसो हेरवाडे आहेत. कल्लाप्पा मरजे, आण्णासो बुबनाळे, रामचंद्र आणुरे, सुभाष बंडगर, प्रकाश बसर्गे, अनिल पट्टेकरी, मयूर पट्टेकरी, बाळासो बंडगर, शहानवाज गवंडी, आदी ज्येष्ठ मंडळी काम पाहत आहेत.