कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:31 IST2017-09-13T21:30:22+5:302017-09-13T21:31:57+5:30
मुंबई - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच
विशेष प्रतिनिधी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. विमानसेवा सुरू करण्यास जीव्हीके कंपनी एअर डेक्कन कंपनीने तयारी दर्शविली असून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून आॅपरेटिंग लायसन्स मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक परवाना पुन्हा मिळविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठी हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जीव्हीके कंपनी व एअर डेक्कन यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि त्यासाठी शासकीय यंत्रणेने त्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश पाटील यांनी दिले.
यावेळी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, जीव्हीके कंपनीचे रविन पिंटो, एअर डेक्कनचे जिगर थाळेश्वर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.