कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्पोर्ट झोन’ फलकाचे दिमाखात अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:48 IST2018-09-13T12:46:04+5:302018-09-13T12:48:07+5:30
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविलेल्या कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्या सन्मानार्थ व इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘स्पोर्ट झोन’ फलक उभारण्यात आला आहे.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्पोर्ट झोन’ या फलकाचे अनावरण आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर : देशाचा झेंडा अटकेपार नेलेल्या व जाकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविलेल्या कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्या सन्मानार्थ व इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘स्पोर्ट झोन’ फलक उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन खुद्द राहीच्याच हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे उपस्थित होते.
यानिमित्त जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने, अनुष्का पाटील, अभिज्ञा पाटील, महिला कुस्तीगीर स्वाती शिंदे, विश्वजित मोरे, बॅडमिंटनपटू प्रेरणा आळवेकर, आदित्य अनगळ (तलवारबाजी) या खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या हस्ते झाला.
अर्जुन पुरस्कार विजेत्या महिला टेबलटेनिसपटू शैलजा साळोखे यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी पाटील व महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडाधिकारी विकास माने यांनी आभार मानले. यावेळी क्रीडाधिकारी बाजीराव देसाई, सुधाकर जमादार, बालाजी बरबडे, सागर जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.