कोल्हापूर: नंदवाळ परिसरात बिबट्या नव्हं तर तरस; वन विभागाकडून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 03:49 PM2022-09-14T15:49:42+5:302022-09-14T15:50:11+5:30
वनविभाग व रेस्क्यू फोर्सने परिसर पिंजून काढून या प्राण्याच्या पायांच्या ठस्यावरून हा बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट करताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दीपक मेटील
सडोली/खालसा : नंदवाळ व कांडगाव (ता.करवीर) गावच्या हद्दीवर असणाऱ्या नागटेक डोंगर परिसरात आज, बुधवारी सकाळी बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. पण तो बिबट्या नसून तरस असल्याची माहिती वन विभागाने दिली असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन रेस्क्यू फोर्सच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतकरी बाजीराव शिंदे यांना सकाळी आपल्या शेताच्या बांधावर बिबट्यासदृश प्राणी बसलेला दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील नागरिकांना तसेच ग्रामप्रशासनाला दिली. यानंतर ग्रामसेवक उत्तम पाटील यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनखात्याचे पथक तपासासाठी नंदवाळ कांडगाव परिसरात दाखल झाले. वनक्षेत्रपाल विजय पाटील, रमेश कांबळे, वनरक्षक राहुल झेनवाल आणि रेस्क्यू टीमच्या वतीने याबाबत पाहणी केली तिथे सापडलेल्या पायाच्या ठशावरून हा प्राणी बिबट्या किंवा वाघ नसून तरस असल्याचे वन विभाग व रेस्क्यू कडून खुलासा करण्यात आला.
ग्रामस्थांनी अफवावर विश्वास ठेऊ नये व घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर वाघ आल्याच्या अफवेने परिसरात भितीचे वातावरण पसरले. वनविभाग व रेस्क्यू फोर्सने परिसर पिंजून काढून या प्राण्याच्या पायांच्या ठस्यावरून हा बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट करताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.