केरूरजवळ अपघात; पाचजण जागीच ठार
By Admin | Updated: August 6, 2015 00:47 IST2015-08-06T00:44:52+5:302015-08-06T00:47:28+5:30
जीप-ट्रकची धडक : तिघे गंभीर

केरूरजवळ अपघात; पाचजण जागीच ठार
अथणी : बेळगाव-चिकोडी-सांगली मार्गावर केरूर (ता. चिकोडी) गावाजवळ जीप व मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन पाचजण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. सर्व मृत कोकटनूर येथील ‘रेणुका शुगर’चे कर्मचारी आहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी सात वाजता झाला.
रेणुका शुगर कारखाना व्यवस्थापनाने बुधवारी बेळगाव येथे तातडीची बैठक बोलावली होती. त्यासाठी शेती विभागातील कर्मचारी जीपमधून गेले होते. बेळगावहून कोकटनूरला परतत असताना ते केरूरनजीक आले असता, सांगलीहून बेळगावला निघालेल्या मालमोटारीने त्यांच्या जीपला जोरदार धडक दिली. या अपघातात जीपमधील पाचजण जागीच ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये रमेश पुजारी (रा. रामतीर्थ), बसवगोंडा पाटील (यंकची), चालक अजित हुद्दार (शिरहट्टी), अजित तीर्थ (शिरहट्टी) यांचा समावेश आहे. अन्य एका मृताचे नाव समजू शकले नाही. अपघातात विरूपाक्ष वाणी (रा. औरखोड), श्रीधर जाधव (सावळगी), मुजाहिद पटेल (करोशी) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बसाप्पा अंगडी, मंडल पोलीस निरीक्षक मलनगौडा नायकर यांनी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)