जगातील सगळ्यात मोठा बॅंक दरोडा, एका देशाच्या राष्ट्रपतीचा मुलगा होता सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:16 PM2023-08-29T17:16:24+5:302023-08-29T17:17:31+5:30
या दरोड्यात एका देशाच्या राष्ट्रपतीचा मुलगा सहभागी होता. अर्थातच ही हैराण करणारी बाब आहे. पण सत्य आहे.
तुम्ही जगातल्या अशा अनेक दरोड्यांबाबत ऐकलं असेल ज्यात लाखों किंवा कोट्यवधी रूपये लुटले गेले होते. पण आज आम्ही तुम्हाला बॅंकेवर टाकलेल्या एका अशा दरोड्याबाबत सांगणार आहोत, ज्याला बॅंक दरोड्याच्या इतिहासातील सर्वात वेगळी घटना मानलं जातं. कारण या दरोड्यात एका देशाच्या राष्ट्रपतीचा मुलगा सहभागी होता. अर्थातच ही हैराण करणारी बाब आहे. पण सत्य आहे.
या दरोड्यातून एकूण एक बिलियन डॉलर म्हणजे आजच्या हिशेबाने साधारण 7562 कोटी रूपये लुटले गेले होते. हा दरोडा इराकमध्ये टाकण्यात आला होता. येथील सेंट्रल बॅंकेतून इतकी मोठी रक्कम लुटण्यात आली होती. या घटनेला आता 17 वर्षे झाली आहेत.
मार्च 2003 मधील ही घटना आहे. त्यावेळी इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन हे होते आणि त्यांची अमेरिकेसोबतची शत्रूता जगजाहीर होती. असे म्हणतात की, इराकने अमेरिकेवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी सद्दाम हुसेनचा मुलगा कुसय बगदाद येथील इराकी सेंट्रल बॅंकेत पोहोचला आणि बॅंकेच्या प्रमुखाच्या हाती एक कागद दिला. या कागदावर लिहिले होते की, सुरक्षा कारणांमुळे बॅंकेतील सर्वच रक्कम राष्ट्रपतींनी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आदेश दिला आहे.
आता त्यावेळी सद्दाम हुसेनची लोकांमध्ये इतकी भीती होती की, त्याचा आदेश धुडकावणं कुणालाही शक्य नव्हतं. त्यामुळे बॅंकेच्या प्रमुखाने पैसे घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्याच्या दुसरा कोणता मार्गही नव्हता.
असे सांगितले जाते की, सद्दाम हुसेनचा मुलगा कुसयने इराकी बॅंकेतून इतके पैसे लुटले होते की, त्याला ते घेऊन जाण्यासाठी कितीतरी ट्रक लागले होते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लुटलेली रक्कम ट्रकांमध्ये भरण्यासाठी त्याला 5 दिवस लागले होते.
असेही सांगितले जाते की, रक्कम इतकी होती की, ती भरण्यासाठी त्याच्याकडे ट्रकही शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे काही रक्कम तिथेच सोडावी लागली.
या दरोड्याबाबत जगाला तेव्हा कळाले जेव्हा या घटनेनंतर लगेच अमेरिकन सेनेने इराकवर बॉम्ब हल्ला सुरू केला. दरम्यान सेंट्रल बॅंकेवरही त्यांनी ताबा मिळवला.
पण त्यांना कळाले की, बॅंकेतील सगळे पैसे तर सद्दामचा मुलगा घेऊन गेला.
त्यानंतर या घटनेची चौकशी सुरू झाली. सद्दाम हुसेनच्या महालाचीही झडती घेण्यात आली. इथे मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली. पण ही रक्कम बॅंकेतून लुटलेली नव्हती. ही रक्कम सद्दामचा दुसरा मुलगा उदयने आधीपासून सांभाळून ठेवलेली होती. कारण त्याला मोठी रक्कम जमा करण्याची आवड होती.
असे मानले जाते की, इतरही काही ठिकाणांची झडती घेण्यात आली. त्या ठिकाणांहून कोट्यवधी रूपये मिळाले. मात्र, अजूनही बॅंकेतून लुटलेल्या रकमेतील मोठा भाग मिळाला नव्हता.
अंदाज लावला जात होता की, सद्दाम हुसेनने ते पैसे सीरियाला पाठवले असतील. पण याचा काहीच पुरावा नव्हता. हा दरोडा दरोड्यांच्या इतिहासातील सर्वात वेगळा दरोडा होता. कारण या दरोड्यात एकही गोळी चालवली गेली नाही किंवा कुणाचं रक्त सांडलं नाही. जे झालं ते सगळं सहज झालं होतं.