धक्कादायक.. जळगावात मृत अर्भकाला कुत्र्याने उचलून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 16:08 IST2017-04-05T16:08:53+5:302017-04-05T16:08:53+5:30
जिल्हा रुग्णालयात एका महिलेच्या प्रसुतीनंतर मृत अर्भकाला कचरा कुंडीत फेकल्यानंतर ते एका भटक्या कुत्र्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघड झाली.

धक्कादायक.. जळगावात मृत अर्भकाला कुत्र्याने उचलून नेले
जळगाव,दि.5- जिल्हा रुग्णालयात एका महिलेच्या प्रसुतीनंतर मृत अर्भकाला कचरा कुंडीत फेकल्यानंतर ते एका भटक्या कुत्र्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांकडून मृतदेहाची विंटबना केल्याप्रकरणी मृत अर्भकाच्या आजीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.
सोयगाव तालुक्यातील पळासखेडे येथील गिताबाई (वय-30) ही महिला मंगळवार 4 रोजी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. बुधवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास या महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र जन्मानंतर ही मुलगी मयत झाली. जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी मयत अर्भक बुधवारी सकाळी महिलेच्या सासूच्या ताब्यात दिले.
मृत अर्भकाची विल्हेवाट कुठं लावावी या विचारात असताना सासूने ते अर्भक जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या कचराकुंडीत टाकले. कचरा कुंडीत असलेले मृत अर्भक एका भटक्या कुत्र्याने उचलत आर.आर.विद्यालय परिसरातील नुक्कड प्रोव्हीजनजवळ टाकले.
नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत अर्भक ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. या प्रकरणी मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
यापूर्वी 4 अपत्यांचा मृत्यू
गीताबाई या पळासखेडे मोगलाईचे येथे राहतात. त्यांचे पती शेती करतात. गीताबाई यांना यापूर्वी 5 अपत्य झाले आहेत. त्यापैकी चार अपत्य हे जन्म झाल्याबरोबर मयत झाले आहेत.