बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:19 AM2018-06-18T01:19:49+5:302018-06-18T01:19:49+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याविषयी सांगितलेल्या आठवणी.

Bahnabai is not a natural landlord | बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच

बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच

googlenewsNext


मान्यवर रसिकांनी बहिणाबाईला निसर्गकन्या, भूमिकन्या म्हटले आहे. खरं तर निसर्गाशी एकरूप झालेली ती भूमिकन्याच होती. आपल्या काळ्या आईवर नितांत प्रेम करणारी, तिच्यावर अपार कष्ट करणारी ती जणू काही काळ्या मातीवर हिरव्या शाईने लिहीत होती व मग ओळीओळीने असंख्य ओळींमध्ये हिरवे कोंब अंकुरले व मोठे झाल्यावर हवेसोबत डोलू लागले की, हिच्याही मनात आनंद डोलत असे, असं निसर्गाशी व काळ्या मातीशी तिचं अतूट नात होतं. निसर्गाच्या प्रत्येक घटकांवर तिचं होत होतं.
पक्षी. प्राणी, नदी, वृक्ष-वेली या सर्वांशी तिचा संवाद चालायचा. माहेरच्या रस्त्यात असलेलं शेवरीचं झाड थोडं मोठं झाल्यावर त्याच्याजवळ थांबून, ‘केवढी मोठी झाली व तू!’ असं विचारणं. शेतामध्ये असलेल्या जुन्या वडाच्या झाडाला, असे बाप्पा, तू युगाचा उभा, पिढी पिढीचा अन् लांब्या दाढीचा! त्याच्या पारब्यांना पाहून त्याच्याशी बोलणं, वाड्यातील निंबाच्या वृक्षाला, ‘निंबाजीबोवा’ व गुलमोहराच्या झाडाला ‘फुलाजी महाराज’ संबोधणं तर, ‘लेकरं कडेवर घेऊन उभी.
कशी माझी लेकुरवाळी रंभा!’ केळीच्या बागेतील घड आलेल्या केळीला म्हणत असे. ह्या प्रत्येकाशी तिचा असा संवाद चालत असे.
शेतामध्ये असलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या सावलीमुळे पिकाचे नुकसान होते, ते तोडून टाका म्हटल्यावर बहिणाबाईनं त्याचा विरोध करत उत्तर दिलं. ‘अरे आंबे खाऊन पोट भरत असेल पण या फुलाजी महाराजाकडे, गुलमोहराकडे पाह्यल की, मन भरून जातं. ह्यावरून तिचं निसर्ग प्रेम तर दिसून येतंच; पण त्याबरोबरच तिची सौंदर्यदृष्टीही दिसून येते.
तिच्या काव्यामध्येसुद्धा निसर्गाची विविध रूपं दिसून येतात. सुगरणीच्या घरट्यावर लिहिलेली ‘खोप्यामधी खोपा’ रचना सुगरणीची कलाकुसर, चातुर्य, वात्सल्य अशा अनेक भावनांना प्रकट करते. घर बांधताना माणसांनीच वन बीएचके, टु बीएचके असा विचार करावा असं नाही. सुगरणीनं पहिल्यापासूनच तो विचार केला आहे. तिच्या खोप्याचे दोन कप्पे असतात. एक आतला व दुसरा बाहेरचा, बहिणाबाईने त्याला खोप्यामधी खोपा म्हटलं आहे. आतला कप्पा मऊतंतू कापूस अशा कोमल धाग्यांनी मऊ केलेला असतो. ज्यात तिची पिलं सुरक्षित असतात. झाडाला टांगलेल्या खोप्याला बहिणाबाईनं झुलता बंगला म्हटलं आहे. ‘जीव झाडाले टांगला’ असताना पिलांची सुरक्षितता, काळजी, वात्सल्य आदी भाव व्यक्त झालेले आहेत.
धरतीमातेच्या मायेबद्दल तिला जाणीव आहे. ‘अशी धरित्रीची माया, असे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्वे पोट तिच्यामधी झाले जमा’ असं म्हणत धरती माता सर्वांची पोशिंदी कशी आहे, हेही सांगते. पहिला पाऊस पडला की, सर्वदूर मृद्गंध दरवळतो. बहिणाबाई म्हणते, आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी, धरतीचा परिमय माझं मन गेलं भरी, शेतात कोंब टरारून वरती आले की, शेताला गहिवरून येते ‘..... शेत जसं अंगावरती शहारे’ हे वाचत असताना आपल्या अंगावरही शहारे येतात. कोंबातून नंतर दोन पाने प्रकटतात, तेव्हा बहिणाबाई वर्णन करताना, ‘पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन’ आणि पुढे म्हणते टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी अशा प्रकारचे वर्णन निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय शक्य नाही. वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त होताना बहिणाबाई निसर्गाचा आधार घेते. अनेक उपमा तिने निसर्गातूनच घेतल्या आहेत. एवढेच काय तिला परमेश्वराचे दर्शनसुद्धा निसर्गाच्या विविध रूपांत होत असे. त्यामुळे या संपूर्ण चराचराशी, निसर्गाशी एकरूप झालेली बहिणाबाई खऱ्या अर्थाने निसर्गकन्या, भूमिकन्याच आहे.
- प्रा.ए.बी. पाटील, जळगाव

Web Title: Bahnabai is not a natural landlord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.