जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:40 AM2020-07-09T03:40:20+5:302020-07-09T03:40:24+5:30
वर्षभरात अमेरिका संघटनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी ६ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
वॉशिंग्टन : कोरोनाच्या जागतिक महामारीत सर्वाधिक जिवितहानी झालेल्या अमेरिकेने अखेर संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेमधून (डब्ल्यूएचओ) बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. संघटनेतून बाहेर पडण्याचा इशारा अमेरिकेने यापूर्वीच दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी या संदर्भात डब्ल्यूएचओला एक नोटीस पाठवली आहे. डब्ल्यूएचओचे चीनशी साटेलोटे असून त्यामुळेच कोरोनाला जागतिक महामारी जाहीर करण्यास संघटनेने दिरंगाई केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
कोरोनाचा उद्रेक चीनच्या वुहान शहरातूनच झाला, मात्र त्याची माहिती संघटनेने दडवून ठेवली त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करता आल्या नाहीत. परिणामी हा विषाणू जगभर वेगाने पसरला व आतापर्यंत सर्वाधिक बळी अमेरिकेत गेले आहेत. ट्रम्प प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करुनही हा संसर्ग रोखता आला नाही. अमेरिकेने डब्ल्यूएचओची ४०० दशलक्ष डॉलरची मदत थांबवण्याबाबतची पाठवलेली नोटीस मिळाल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षाच्या प्रवक्त्याने त्यास दुजोरा दिला आहे. संघटनेच्या जिनिव्हा येथील मुख्य कार्यालयास नोटीस मिळाली असून, वर्षभरात अमेरिका संघटनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी ६ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
मेपासूनच ट्रम्प व डब्ल्यूएचओ यांच्यात मतभेद पराकोटीला गेले होते. ही संघटना चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर संघटनेची ४०० दशलक्ष डॉलरची मदत रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
...तर अमेरिका पुन्हा सहभागी : ज्यो बिडेन
ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओतून बाहेर पडण्याचे सुतोवाच केले असले तरी आपण निवडून येताच अमेरिका पुन्हा संघटनेत सहभागी होईल, असेही ज्यो बिडेन यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे स्थान या संघटनेत महत्त्वाचे आहे, अगदी प्रारंभी म्हणजे १९४८ मध्ये ही संघटना स्थापन झाल्यानंतर वर्षभरात काही मतभेदामुळे अमेरिका बाहेर पडली होती. नंतर काही काळात पुन्हा अमेरिकेचा संघटनेत सक्रीय प्रवेश झाला.