स्थायी समितीत गाजली टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:29 IST2018-03-07T00:29:40+5:302018-03-07T00:29:44+5:30
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली.

स्थायी समितीत गाजली टंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली.
जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, अति.मुकाअ मुकीम देशमुख आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील तिन्ही प्रादेशिक योजनांसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.
जवळपास आठ कोटी रुपये मंजूर असतानाही या योजनेच्या तांत्रिक मान्यतेचा प्रश्न त्रुटी दूर न केल्याने लटकून पडला आहे. मागील सहा महिन्यांपासून या त्रुटी दूर केल्या जात नसल्याचा सवाल जि.प. सदस्य अंकुशराव आहेर यांनी केला. तेव्हा कालच याबाबतच्या त्रुटी दूर करून प्रस्ताव सादर केल्याचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याच्या पाणीटंचाईचा १८ कोटींचा आराखडा सादर झालेला असताना एकही काम अद्याप सुरू नाही. ३५0 पैकी केवळ ६४ गावांत विंधन विहिरी घेणे शक्य असल्याचे सर्व्हेत आढळल्याचे सांगण्यात आले. मात्र सर्व्हेच वस्तुनिष्ठ होत नसल्याने अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा आरोपही आहेर यांनी केला. तर अजित मगर यांनी झरा येथील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल आॅडिट होत नसल्याने संताप व्यक्त केला. तसेच कारखान्यांच्या वाहनांमुळे रस्ते खराब होतात. त्यामुळे संबंधित कारखान्यांकडूनच त्यांची दुरुस्ती करून घेण्याची मागणीही त्यांनी केली.
कुरुंदा येथील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा जि.प.सदस्य संजय कावरखे यांनी चांगलाच लावून धरला. या अतिक्रमणामुळे होणारी अडचण त्यांनी मांडली. त्यानंतर येत्या स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन सीईओ तुम्मोड यांनी दिले. वाई (धामणगाव) येथे वित्त आयोगात अपहार झाल्याची चौकशी करूनही संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा मुद्दा आहेर यांनी मांडला.
दुर्धर आजारावर मदतीसाठी वाढीव तरतुदीचा प्रश्न मागील तीन स्थायी समितीच्या बैठकीत गाजल्यानंतरही आज पुन्हा तशी तरतूदच झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून आधी १00 जणांना मदतीचे वाटप करण्यास सांगून आणखी १00 जणांचे प्रस्ताव तयार असल्याने त्यासाठी तरतूद उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले.
मागील बैठकीत वाळूचे लिलाव झाले नसल्याने विविध ठिकाणच्या कामांसाठी वाळू मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून यासाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असा ठराव घेतल्यानंतरही जिल्हाधिकाºयांना मात्र तो पाठविलाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही वाळू मिळत नसल्याने ऐन मार्च एण्डला अनेक कामे ठप्प झाल्यास काय करायचे, असा सवाल सदस्यांनी केला.