गोंदिया जिल्ह्यातील १०६५ शाळांमध्ये करणार सौर उर्जेची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:14 IST2019-01-21T13:13:35+5:302019-01-21T13:14:24+5:30
गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळणाऱ्या सादीलवार राशीतून वीज बील भरणे शक्य होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सौर उर्जेची सोय करण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील १०६५ शाळांमध्ये करणार सौर उर्जेची सोय
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळणाऱ्या सादीलवार राशीतून वीज बील भरणे शक्य होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सौर उर्जेची सोय करण्यात येणार आहे. त्या संबधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ठराव घेऊन शासनाला पाठविला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकत आहेत. परंतु त्यांचे साधनाअभावी नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली आहे. शाळेतील गुणवत्ता व भौतिक सुविधा टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग जोमाने काम करीत आहे. शाळा डिजीटल झाल्या परंतु त्या शाळांचा वीज बील भरणा कसा करावा या विवंचनेत मुख्याध्यापक नेहमीच असतात. ज्या शाळेचे बील भरले जात नाही त्या शाळांचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. पुन्हा कशीतरी तोडजोड करून पैसे भरून त्या शाळांचा वीज पुरवठा सुरू केला जातो.
या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आता प्रत्येक शाळेत सौर उर्जेपासूनच उपकरणे वापरावी यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (दि.१५) शिक्षण सभापती रमेश अंबुले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत हा महत्वपूर्ण ठराव घेऊन तो ठराव शासनाला पाठविण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील १०६५ शाळांमध्ये सौर उर्जेची सोय करण्याचा निश्चय केला आहे. त्यात अर्जुंनी-मोरगाव तालुक्यातील १३७, आमगाव ११६, देवरी १४४, गोंदिया १८८, गोरेगाव १०९, सालेकसा ११७, सडक-अर्जुंनी ११५, तिरोडा १३९ शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांत शिकणाºया मुलींच्या सुविधेसाठी शौचालयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात यावे, जिल्ह्यातील सर्वच शाळांत शंभर टक्के शिक्षकांची संख्या असे विविध ठराव या सभेत घेण्यात आले.