सागवानची अवैध तोड
By Admin | Updated: November 13, 2016 02:06 IST2016-11-13T02:06:58+5:302016-11-13T02:06:58+5:30
आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा नजीक असलेल्या सावलखेडा व पळसगाव जंगलात सागवान वृक्षाची

सागवानची अवैध तोड
लाखो रूपयांचे नुकसान : सावलखेडा, पळसगाव जंगलातील प्रकार
जोगीसाखरा : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा नजीक असलेल्या सावलखेडा व पळसगाव जंगलात सागवान वृक्षाची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात तोड सुरू असून यामध्ये लाखो रूपयांची वनसंपत्ती नष्ट होत आहे. मात्र याकडे वन विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा कक्ष क्रमांक ३१ व पळसगाव वनकक्ष क्रमांक ८२२ मध्ये शेकडो हेक्टर जमिनीवर सागवानाचे महागडे व इमारती लाकडाचे जंगल आहे. पळसगाव येथील संबंधित वनरक्षक मुख्यालयी असलेल्या आपल्या शासकीय निवासस्थानाला कुलूप लावून आरमोरी तालुका मुख्यालयी वास्तव्य करतात. सदर वनरक्षकाकडे दोन बिटाचा कारभार सोपविण्यात आला असला तरी एकाही बिटातील वनसंरक्षणाची जबाबदारी नीट सांभाळताना सदर वनरक्षक दिसून येत नाही. प्रत्यक्ष जंगलात न जाता वन परिक्षेत्र कार्यालयातूनच वनांचे संरक्षण केले जात असल्याने वनतस्कर मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाचा फायदा घेत वनतस्कर महागड्या सागवानची मोठ्या प्रमाणात खुलेआम कत्तल करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सावलखेडा व पळसगावच्या जंगल परिसरात वनतस्करी प्रचंड वाढली आहे.
संबंधित वन परिक्षेत्राधिकारी आपल्या अधिनस्त वन कर्मचाऱ्यावरील नियंत्रण सैल केल्याने वनरक्षक व इतर कर्मचारी याचा फायदा घेत आहेत. परिणामी कोट्यवधी रूपयाचे सागवान वन तोडले जात असल्याने शासकीय महसूल बुडत आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी अद्यापही सुस्त आहेत. या संदर्भात आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते उपविभागीय वनाधिकारी कार्यालयात बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
अहवाल निरंक
सावलखेडा व पळसगाव या दोन्ही बिटाचा कारभार एकाच वनरक्षकाकडे सोपविण्यात आला असल्याने अधिकाऱ्यांपुढे वेळे मारून नेण्याची संधी प्राप्त झाली आहे. नियमितपणे बिट निरिक्षण अहवाल संबंधित वनाधिकाऱ्यांकडे सादर केले जातात. मात्र वरील दोन्ही बिटाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असूनही वृक्षकटाईचा अहवाल निरंक दाखविण्याचा प्रताप बिट निरिक्षकाकडून केला जात आहे. यात अधिकार व जबाबदारीची पूर्णता पायमल्ली होत आहे. शासनाचा महसूल बुडत असल्याने अवैध सागवान वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या वनरक्षक व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी सावलखेडा व पळसगाव वासीयांनी केली आहे.