Asian Games 2018: ... खरंच यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:34 AM2018-09-04T03:34:11+5:302018-09-04T08:30:48+5:30

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली.

Asian Games 2018: ... Was it really the best for the Asian Games this year? | Asian Games 2018: ... खरंच यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का?

Asian Games 2018: ... खरंच यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का?

Next

- रोहित नाईक

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली. याआधी ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ६५ पदके पटकावलेली, तर यंदा भारतीय खेळाडूंनी एकूण पदकसंख्या ६९ केली. भारतीय खेळाडूंचे कौतुक होत असून ते झालेही पाहिजे, परंतु त्याचवेळी आपण अजूनही बरेच मागे आहोत याचे भानही राहणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत पहिल्या तीन स्थानांमध्ये भारत कसा स्थान पटकावेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने चीन आणि भारत यांचा जगात पहिल्या दोन स्थानांमध्ये क्रमांक लागतो. मात्र असे असले, तरी या दोन देशांमधील क्रीडा प्रगतीमध्ये कमालीचा फरक जाणवेल. १९५१ सालापासून सुरू झालेल्या आशियाई स्पर्धेचे सर्वप्रथम यजमानपद भूषविले ते, भारताने. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या सर्व १८ सत्रांमध्ये सहभाग घेतला. यातील पहिल्या सत्रात मिळविलेले दुसरे स्थान आणि १९६२ साली जकार्ता येथेच मिळविलेले तिसरे स्थान या कामगिरीचा अपवाद वगळता भारतीय संघाला एकदाही अव्वल तीनमध्ये स्थान पटकाविता आले नाही. त्याचवेळी तेहरान येथे १९७४ साली झालेल्या सत्रामध्ये चीनने आशियाई स्पर्धेत पदार्पण केले. पदार्पणातच एकूण पदकसंख्या १०६ करताना चीनने आपल्या भविष्यातील वर्चस्वाचा इशारा दिला. यानंतर १९८२ साली नवी दिल्लीत झालेली आशियाई स्पर्धा चीनची केवळ तिसरी स्पर्धा होती आणि यामध्ये त्यांनी तब्बल ६१ सुवर्ण जिंकून एकूण १५३ पदकांसह पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. यासह त्यांनी आशियाई स्पर्धेतील जपान व कोरिया यांचे असलेले वर्चस्वही मोडले. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यानंतर चीनने आपले अव्वल स्थान कधीही सोडले नाही. २०१० साली ग्वांग्झू स्पर्धेत भारतीय आपली सर्वोत्तम कामगिरी झाल्याचे दाखले देत असताना याच स्पर्धेत चीनने कोणालाही हेवा वाटेल अशी कामगिरी करत १९९ सुवर्णपदकांची घसघशीत कमाई करत तब्बल ४१६ पदकांवर कब्जा केला. यावरूनच चीनची क्रीडा प्रगती लक्षात येते. त्यामुळेच प्रश्न पडतो की, खरंच यंदाची स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का? एकीकडे चीन दरवेळी आपला दबदबा राखत असताना दुसरीकडे, भारताला अव्वल ५ देशांमध्ये स्थान मिळवितानाही झगडावे लागत आहे. आतापर्यंत केवळ ७ वेळा भारताने अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळवले. यंदा भारतीय संघाने अशी कामगिरी केली असती, पण हॉकी, कबड्डी अशा हक्कांच्या स्पर्धांशिवाय काही स्पर्धांमध्ये थोडक्यात हुकलेल्या सुवर्णपदकांचा फटका आपल्याला बसला. मुळात कोणत्या खेळातील चुकांमुळे आपण मागे पडलो किंवा कुठे आपण कमी पडलो, यावर विचारविनिमय करण्यात आता अर्थही उरला नाही. आता गरज आहे ती, क्रीडा क्रांती घडविण्याची आणि यासाठी गरज आहे ती गुणवान खेळाडूंची फळी निर्माण करण्याची. आज चीन केवळ आशियाई स्पर्धाच नव्हे, तर आॅलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेत अमेरिका, रशिया यांसारख्या महासत्तांना मागे टाकत आहे. हे यश चीनने कसे मिळविले यावर अनेकदा चर्चा झाली. नुसती चर्चाच नाही, तर अभ्यासही झाला. पण प्रत्यक्षात कृती मात्र कधीच झाली नाही आणि त्याचेच परिणाम अजूनही आपल्याला भोगावे लागत आहेत.

Web Title: Asian Games 2018: ... Was it really the best for the Asian Games this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.