चिखली येथे छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:20 IST2018-12-26T16:19:39+5:302018-12-26T16:20:56+5:30
चारित्र्यावर संशय घेणे, घरखर्चासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आणावेत, असा तगादा लावणे, चोरीचा आळ घेणे अशाप्रकारे आरोपींनी संगनमताने तिचा छळ केला.

चिखली येथे छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या
पिंपरी : विविध प्रकारे मानसिक, शारीरिक छळ केल्यामुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने रविवारी नेवाळेवस्ती, चिखली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल प्रविण देवकर (वय २१) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या आणखी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रविण भारत देवकर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भाऊसाहेब आसबे (वय ४५,रा. मंगळवेढा, सोलापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. तर प्रविण भारत देवकर (वय २५, मुळ. मंगळवेढा, सोलापुर) सध्या नेवाळेवस्ती येथे वास्तव्यास आहेत. या प्रमुख आरोपीसह भारत सोपान देवकर (वय ५५), सजाबाई भारत देवकर (वय ४८), महोदव मोरे (वय ४५), सुवर्णा महादेव मोरे (वय ४०) अशी आरोपींची नावे आहेत. चारित्र्यावर संशय घेणे, घरखर्चासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आणावेत, असा तगादा लावणे, चोरीचा आळ घेणे अशाप्रकारे आरोपींनी संगनमताने तिचा छळ केला. या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला पोलीस उपनिरीक्षक आर. टी. सावंत या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.