पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: December 22, 2023 06:45 PM2023-12-22T18:45:50+5:302023-12-22T18:45:57+5:30
साकोली तालुक्यातील संतापजनक प्रकार : ६ आरोपींना अटक १ फरार
भंडारा : १२ व्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय पोटच्या अल्पवयीन मुलीला खुद्द आई वडिलांनीच पैशासाठी देह व्यापारात ढकलले. एवढेच नाही तर, अनेक व्यक्तींकडून इतरत्र ठिकाणी पाठवून सामूहिक अत्याचाराला भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार साकोली तालुक्यात घडला आहे. पीडितेच्या काकूने साकोली पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन यातील सहा आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी फरार आहे.
साकोली तालुक्यातील एका गावाची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी साकोलीत एका महाविद्यालयात १२ वीत शिकत होती. गावावरून रोज येण्याजाण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोलीत काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले. बऱ्याच दिवसापासून पीडीतेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने १४ डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी पीडीतेने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आणि तीचे आरोग्य बिघडल्याचे कथन केले. यावरून काकूने पुढाकार घेत पीडीतेला साकोली पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदवली.
या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी तात्काळ पिडीतेच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. यातील एक आरोपी फरार असून त्याचा साकोली पोलिस कसून शोध घेत आहे. यात आरोपींवर भादंवि ३७६ (१), (२), एन,जे, ३७६ ड, ३७०, ३४, पोस्को (४),(६) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आईवडीलांकडूनच पुढाकार
पैशासाठी पोटच्या मुलीला आईवडिलांनीच ओळखीतल्या काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी व मारहाण केली. हा प्रकार सतत वाढत गेला, महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आले. कधी पिडीतेवर गावातील घरीच आई-वडिलांच्या समक्ष तर कधी साकोलीत, तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडीतेवर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले.
पिडीतेचे वडील कोणतेही काम करत नाहीत. त्याचे दागिन्यांचे दुकान असले तरी ते बंद आहे. गावात त्याचे एक मोडकळीस आलेले घर असून त्याला दारूचे व्यसन आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तिच्या आईवडीलांनी मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याची तक्रार आहे.
साकोली तालुक्यातील एका गावी १७ वर्ष ७ महिने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक झाली असून एक फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या घटनेत पिडीतेच्या आईवडीलांचा सहभाग असून यांना अटक करीत भंडारा कारागृहात रवानगी केली आहे.
- लोहित मतानी, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा