रुग्णांनी मोफत औषधी मागितली, शासनाने दिले औषधांचे दुकान; गरिबांचा खिसा रिकामा होणारच
By संतोष हिरेमठ | Published: March 5, 2024 02:10 PM2024-03-05T14:10:38+5:302024-03-05T14:11:01+5:30
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाहीत. कारण या ठिकाणी औषधालयच नाही
छत्रपती संभाजीनगर : औषधी खरेदी करून ती रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘औषधनिर्माता’ हे पद पुनर्जीवित करण्याची मागणी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने शासनाकडे केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून शासनाने याठिकाणी जेनेरिक औषधी दुकान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णांना औषधी खरेदी करण्याचीच वेळ ओढावणार आहे.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाहीत. कारण या ठिकाणी औषधालयच नाही आणि शासनाकडूनही औषधी-गोळ्यांचा पुरवठा होत नाही. कारण या ठिकाणचे औषधनिर्मात पद रिक्तच राहिले आणि कालांतराने व्यपगत झाले.
रुग्णालयाने शासनाकडे केलेली मागणी
दंत उपचारासाठी दाखल होणारे बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यांना खासगी दुकानातून औषधी-गोळ्या खरेदी करणे दुरापास्त असते. त्यामुळे त्यांना मोफत औषधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. औषधींची मागणी अथवा संस्था स्तरावरून खरेदी करून रुग्णांना मोफत वितरित करता येण्यासाठी औषधनिर्माता हे पद पुनर्जीवित करण्यात यावे, अशी मागणी शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे केली आहे.
शासनाने घेतलेला निर्णय
राज्यभरातील १८ शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालयात संस्थांमार्फत जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्यास १ मार्च रोजी शासन निर्णयाद्वारे परवानगी देण्यात आली. यात शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश आहे.
घाटीत जनऔषधी केंद्र असताना आता डेंटलसाठी ‘दुकान’
घाटी रुग्णालयात सध्या जनऔषधी केंद्र आहे. शासकीय दंत महाविद्यालयापासून अवघ्या काही अंतरावरच हे केंद्र आहे. हे केंद्र असताना शासकीय दंत महाविद्यालयात जेनेरिक औषधी दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
ब्रँडेड औषधी मारणार रुग्णांच्या माथी
जेनेरिक औषधी केंद्रात जेनेरिक औषधी उपलब्ध नसल्यास ब्रँडेड औषधी, सर्जिकल साहित्य आदींच्या दर्शनी मूल्यावर किमान १० टक्के सवलत रुग्णांना देण्याचे बंधनकारक राहील, अशी अट टाकण्यात आली आहे. दंत रुग्णांना मोफत औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी खिसाच रिकामा करण्यावर भर दिला जात असल्याची ओरड होत आहे.
मोफत औषधी मिळावी
घाटी रुग्णालयाप्रमाणे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातही रुग्णांना मोफत औषधी मिळावी. शासकीय दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेले औषधनिर्माता पद उपलब्ध करून दिले पाहिजे.
- ॲड. इकबालसिंग गिल, सदस्य, अभ्यागत समिती.