अरे व्वा! खाद्यपदार्थ विक्रीसाठी बचत गटांना मिळणार ‘फूड व्हॅन’

By विजय सरवदे | Published: January 24, 2024 03:54 PM2024-01-24T15:54:46+5:302024-01-24T15:54:56+5:30

जि.प.ची नावीन्यपूर्ण योजना : सव्वा कोटीच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी

Oh wow! Self-help groups will get food vans for selling food. | अरे व्वा! खाद्यपदार्थ विक्रीसाठी बचत गटांना मिळणार ‘फूड व्हॅन’

अरे व्वा! खाद्यपदार्थ विक्रीसाठी बचत गटांना मिळणार ‘फूड व्हॅन’

छत्रपती संभाजीनगर : महिला बचत गटांनी तयार केलेल्या सर्वच वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी एक अभिनव संकल्पना आखली आहे. जिल्ह्यातील १६ बचतगटांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीसमोर एक कोटी २० लाखांचा प्रस्ताव सादर केला आहे.

जिल्ह्यात १८ हजार ३८१ महिला बचत कार्यरत आहेत. गाव व परिसरातील बचतगटांना व्यवहारात पारदर्शकता आणणे, सरकारकडून मिळणाऱ्या निधीचे व्यवहारस्वातंत्र्य व योग्य व्यवस्था राहावी; तसेच उत्पन्न व खर्चाचे मूल्यांकन करणे, अंदाजपत्रकावर योग्य नियंत्रण ठेवण्यास ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत. ग्रामसंघात गावातील २० ते २५ बचतगटांचा समावेश असतो. याशिवाय, जि. प. गट अथवा मतदारसंघातील बचत गटांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी प्रभागसंघ स्थापन करण्यात आले आहेत. प्रभागसंघांत जवळपास १० ग्रामसंघांचा समावेश असतो. जिल्ह्यात ८०३ ग्रामसंघ, तर ४२ प्रभागसंघ कार्यरत आहेत.

जिल्हा परिषदेने छत्रपती संभाजीनगर मुख्यालयात एका बचत गटाला कॅन्टीन चालविण्याचा ठेका अल्पदरात दिलेला आहे. बचत गटांकडून वेगवेगळे लोणचे, चटण्या, कुरडई, पापड यांसह वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले जात असून नागरिकांकडून त्यास चांगली मागणी आहे. हे लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सिरसे यांनी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत बचत गटांना ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आखली. त्यासाठी दोन प्रभाग संघ आणि १४ ग्रामसंघांना एकूण १६ ‘फूड व्हॅन’ देण्यासाठी १ कोटी १९ लाख ८१ हजार ४०० रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली असून, तो जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे.

गर्दीच्या ठिकाणी होईल फायदा
जिल्हा नियोजन समितीकडून ‘फूड व्हॅन’चा प्रस्ताव मंजूर झाल्यास ‘फूड व्हॅन’ खरेदीसाठी निविदा काढल्या जातील. आठवडी बाजार, यात्रा, एमआयडीसीतील चौक, शहर किंवा गर्दीच्या ठिकाणी या ‘व्हॅन’ उभ्या करून बचत गटांकडून नाष्टा, चहा तसेच अन्य खाद्यपदार्थांची चांगल्या प्रकारे विक्री करू शकतील, असा कयास लावला जात आहे.

 

Web Title: Oh wow! Self-help groups will get food vans for selling food.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.