मराठा आरक्षण: निजामकालीन दस्तऐवजांसाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

By विकास राऊत | Published: September 19, 2023 07:11 PM2023-09-19T19:11:59+5:302023-09-19T19:13:52+5:30

निजामकालीन अभिलेखांच्या तपासणीसाठी राज्य महसूल विभागाचे पथक जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्या नेतृत्वात ६ सप्टेंबरला हैदराबादला गेले होते.

Maratha Reservation: A team that went to Hyderabad for Nizam documents returned empty-handed | मराठा आरक्षण: निजामकालीन दस्तऐवजांसाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

मराठा आरक्षण: निजामकालीन दस्तऐवजांसाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला निजामकालीन दस्तऐवजांच्या आधारे सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये १७ दिवस उपोषण झाल्यानंतर सरकार दस्तावेज शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून दस्तावेज शोधण्यासाठी हैदराबादला एक पथक पाठविण्यात आले होते. त्या पथकाच्या हाती सध्या तरी काहीही लागले नाही, अशी माहिती विभागीय प्रशासन सूत्रांनी दिली.

निजामकालीन अभिलेखांच्या तपासणीसाठी राज्य महसूल विभागाचे पथक जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्या नेतृत्वात ६ सप्टेंबरला हैदराबादला गेले होते. यात उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, बीड जि.प. सीईओ अविनाश पाठक, बाबासाहेब बेलदार, अप्पर जिल्हाधिकारी, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी व इतर काही अधिकारी व उर्दू भाषा जाणकारांचा समावेश होता. हैदराबादमध्ये जुन्या रेकॉर्डची पथकाने पाहणी केली.

सूत्रांनी सांगितले, पथकाचा अंतिम अहवाल आला नाही, परंतु खूप काही हाती लागले नाही. सर्व प्रकारचे रेकॉर्ड तपासले, त्यातून खूप काही सापडले नाही. १९३१ व त्यापूर्वीच्या जनगणनेची घरयादी मिळाली नाही. ती यादीच महत्त्वाची होती. जे दस्तावेज सापडले, ते आणले. त्यातील काही फारशी भाषेमध्ये आहेत. परंतु, कुणबीचा संदर्भ त्यात आढळला नाही. सनद (मुन्तकब)ची संख्या १२०० च्या आसपास आहे. त्यात १ हजार सनद राज्यातील असतील. त्यात मुस्लिमांना जास्त सनदा दिल्याचे आढळले. त्यामुळे जिल्हानिहाय कक्ष स्थापनेचे आदेश आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दिले. त्यात १० ते १२ अधिकारी वेगवेगळ्या विभागांचे आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक नमुना तयार केला असून, त्यातील मुद्द्यानुसार सापडलेल्या रेकॉर्डची माहिती येणार आहे. ती माहिती संशोधन समितीला देण्यात येणार आहे. जिल्हानिहाय रेकॉर्ड तपासणीनंतर येणाऱ्या माहितीवर सगळे काही अवलंबून आहे.

हैदराबादमधील जुने रेकॉर्ड नष्ट केले.....
हैदराबादमधील जुने रेकॉर्ड नष्ट करण्यात आले आहे. पथकात कोणी फारशी भाषेचा जाणकार नसल्यामुळे गुगल ट्रान्सलेटरवर मजकूर टाकून पाहिला. त्यातूनही कुणबी नोंदीचे संदर्भ आढळले नाहीत. १९३० पासूनच्या तुरुंगांच्या नोंदी तपासण्यासाठी तयारी केली आहे. मुक्तिसंग्राम लढ्यात तुरुंगवास भोगलेल्यांची संख्या मोठी आहे.

मराठवाड्यात किती अभिलेखांमध्ये नोंदी?
मराठवाड्यातील १९६७ पर्यंतच्या ३५ लाखांहून अधिक अभिलेखांपैकी ४,१६० वर कुणबी नोंद प्रथमदर्शनी आढळली आहे. १९६७ पर्यंत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, परभणी व नांदेड हे जिल्हे होते. नंतरच्या काळात जालना, हिंगोली, लातूर जिल्ह्यांची निर्मिती झाली. सध्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा तपासणीचे काम सध्या सुरू आहे. त्याला १ महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. ५ वर्षांत ६३२ जणांनी कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी अर्ज केले. त्यातील ६११ अर्ज मंजूर तर १९ अर्ज नामंजूर केले आहेत. सध्या मराठवाड्यात सव्वा कोटीच्या आसपास मराठा समाजाची लोकसंख्या असू शकते.

जिल्हानिहाय कुणबी नोंदी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४, जालना ३५६, बीड ८५१, परभणी २६६०, हिंगोली ११, धाराशिव १०१, लातूर ४५, नांदेड ५१ मिळून ४,१६० अभिलेखांवर कुणबी नोंदी आढळल्या. अभिलेख तपासणीचे काम सध्या सुरू असून, हैदराबादला गेलेल्या पथकाला काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

Web Title: Maratha Reservation: A team that went to Hyderabad for Nizam documents returned empty-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.