'मला घ्यायला या', शेवटच्या कॉलनंतर तरुण बेपत्ता; ३ दिवसांनी आढळला मृतदेह
By सुमित डोळे | Published: April 16, 2024 01:24 PM2024-04-16T13:24:23+5:302024-04-16T13:24:52+5:30
तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह डोंगराच्या पायथ्याखाली आढळला
छत्रपती संभाजीनगर : शनिवारी दुपारी घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुनील गौतम जाधव (२४, रा. राहुलनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने हा खूनच असल्याच्या निष्कर्षानंतर छावणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कांचनवाडी येथील कंपनीमार्फत हाऊसकीपिंगचे काम करत होते. १३ एप्रिल रोजी ते कुटुंबाला मित्रांसोबत बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ते कुटुंबाच्या मोबाईलद्वारे संपर्कात होते. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. घाबरलेल्या कुटुंबाने त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र सोमवारी दुपारपर्यंत ते मिळून आले नाही. दुसरीकडे पडेगावच्या पेठेनगरमध्ये वनविभागाच्या डोंगराच्या पायथ्याशी बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणांना दुर्गंधी जाणवली. त्यांनी परिसरात पाहणी केली असता एका आटलेल्या ओढ्यात त्यांना तरुणाचा फुगलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती कळताच छावणीचे निरीक्षक राजेंद्र होळकर, उपनिरीक्षक सोपान नराळे यांनी धाव घेतली. त्यानंतर सुनील यांचा मृतदेह घाटीच्या शवविच्छेदन विभागाकडे रवाना करण्यात आला.
मला भावसिंगपुऱ्यात घ्यायला या, शेवटचा कॉल
सुनील यांनी ४ वाजता कुटुंबाला ते भावसिंगपुऱ्यात असल्याचे कळवले होते. त्याच्या काही मिनिटांमध्येच त्यांनी दोन नातेवाईकांना कॉल करून भावसिंगपुऱ्यात घ्यायला येण्यासाठी संपर्क साधला. मात्र, दाेघेही खरेदीमध्ये व्यस्त असल्याने ते तत्काळ जाऊ शकले नाही. काही वेळातच सुनील यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तोपर्यंत मोबाईल बंद झाला होता. त्याच दरम्यान त्यांना पडेगाव परिसरात नेऊन हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत तांत्रिक तपासासह सुनील यांच्या मित्रांची कसून चौकशी सुरू होती.