लिव्ह ईन रिलेशनशीपमधून बाळाचा जन्म; अनाथालयातील बाळ विक्री प्रकरणात आईची कबुली
By सुमित डोळे | Published: June 23, 2023 04:04 PM2023-06-23T16:04:39+5:302023-06-23T16:28:06+5:30
पतीच्या निधनानंतर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना महिला राहिली गर्भवती
छत्रपती संभाजीनगर : पैठणच्या एका महिलेने अडीच महिन्यांचे बाळ शहरातील एका अनाथालयाला दिलेेले बाळ अनाथालय चालकाने पाच लाख रुपयांमध्ये विक्रीस काढल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. बुधवारी मुलाची आईच स्वत: जवाहरनगर पोलिस ठाण्यात हजर राहिली. पित्याच्या निधनानंतरच त्याचा जन्म झाला होता. लोणी येथे २ एप्रिल रोजी जन्म झाल्यानंतर मी ते अनाथालयास दिले, अशी कबुली तिने पोलिसांसमोर दिली.
शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमाचा संचालक दिलीप श्रीहरी राऊत व त्याची पत्नी सविता यांनी पाच लाखांमध्ये एका व्यावसायिकाला बाळ विकायला काढले होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे आलेल्या बाळाला त्याने थेट विकायला काढले होते. भरोसा सेलच्या निरीक्षक आम्रपाली तायडे यांना मंगळवारी सकाळी याची माहिती मिळाली होती. निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांच्या मदतीने उपनिरीक्षक अनिता फसाटे, ज्योती गात यांनी छापा टाकला असता, त्यांना बाळ आढळून आले. शिवाय, बाळ विकत घ्यायला आलेले दाम्पत्य देखील तेथे होते. त्यांनी देखील दहा हजार रुपये ॲडव्हान्स देऊन पाच लाखांमध्ये ती विक्रीचा व्यवहार करणार होते, अशी कबुली दिली.
दोन तास जबाब, आई असल्याचे पुरावे
सदर बाळाची आई बुधवारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात हजर झाली. तिने केंद्रे, चंदन यांना सर्व खरे सांगत कबुली दिली. पतीच्या निधनानंतर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना ती गर्भवती असल्याने शिर्डीला गेली. लोणी येथील रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तिने त्याला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्याशिवाय, महिला व बालविकास विभाग, समाजकल्याण विभागाला पत्रव्यवहार करून अनाथालयाची माहिती मागवणार असल्याचेही केंद्रे यांनी सांगितले.