दवाखान्यात पत्नीस भेटण्यास आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले, रिक्षाचालकाचा प्रताप
By राम शिनगारे | Published: May 24, 2023 09:04 PM2023-05-24T21:04:40+5:302023-05-24T21:05:24+5:30
पुंडलिकनगर पोलिसांनी सहा तासात आरोपीस शोधून ठोकल्या बेड्या
छत्रपती संभाजीनगर : ऐशी वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी आले होते. दुपारी १२ वाजता पत्नीस भेटून घरी जाण्यासाठी रिक्षात बसले. त्या रिक्षाच्या चालकासह सहप्रवाशाने त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. ही घटना मंगळवारी दुपारी पुंडलिकनगर भागात घडली. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी सहा तासांच्या आत आरोपीस शोधून बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ सूर्यभान सुरासे (८०, रा. बीड बायपास) हे मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर भागातील मेडीआर्ट हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या पत्नीस भेटण्यास आले होते. पत्नीला भेटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांनी एका रिक्षाला हात दाखवला. रिक्षा थांबल्यानंतर त्यांनी शिवाजीनगरला सोडण्यास सांगितले. त्यानुसार सुरासे रिक्षात बसल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर आणखी एक प्रवाशी रिक्षात बसला. त्याने सुरासे यांना बोलत असतानाच त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. वृद्ध असल्यामुळे युवकाचा प्रतिकारही करू शकले नाहीत.
त्याचवेळी दोघांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत गारखेडा परिसरात रिक्षातून उतरून दिले. त्यानंतर सुरासे यांनी पुंडलिकनगर ठाणे गाठत आपबिती सांगितली. तेव्हा निरीक्षक राजश्री आडे यांनी उपनिरीक्षक संदीप काळे, हवालदार बळीराम चौरे, अजय कांबळे, दीपक जाधव यांना रिक्षाचा शोध घेण्याचे आदेश दिले. सहा तासाच्या आत रिक्षाचालक शेख वसीम अक्रम शेख अब्दुल कादर (४०, रा. चिश्तिया कॉलनी, एन ६, सिडको) यास पोलिसांनी शोधुन बेड्या ठोकल्या. रिक्षाचालकाकडून रोख रक्कम आण रिक्षा असा एकुण १ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती निरीक्षक आडे यांनी दिली.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
पुंडलिकनर पोलिसांनी आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे. तपास उपनिरीक्षक संदीप काळे करीत आहेत.