बांगडी प्रशिक्षणातून मिळणार महिलांना स्वयंरोजगार
By Admin | Updated: March 27, 2017 00:31 IST2017-03-27T00:31:28+5:302017-03-27T00:31:28+5:30
भंडारा वनविभागांतर्गत ग्रामवन समिती असलेल्या गावातील महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी लाख बांगड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

बांगडी प्रशिक्षणातून मिळणार महिलांना स्वयंरोजगार
कोका येथे प्रशिक्षण : ग्रामवन समितीच्या गावातील महिलांचा समावेश
भंडारा : भंडारा वनविभागांतर्गत ग्रामवन समिती असलेल्या गावातील महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी लाख बांगड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून ग्रामीण महिला स्वत:च्या पायावर उभ्या व्हाव्या व स्वत:सह कुटुंबाचे उदरनिर्वाह करावे यासाठी त्यांना हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणारे आहे.
भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका येथील विश्रामगृह येथे हे प्रशिक्षण पार पडले. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत अभयारण्याच्या कार्यक्षेत्रातील कोका व माटोरा येथील २३ महिलांना पळसाच्या झाडाच्या लाखीपासून बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना त्यांच्या गावातील समिती अध्यक्ष व सचिवांनी प्रोत्साहीत केल्याने त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. बालाघाट (मध्यप्रदेश) येथील सी. के. लाख प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचे सी.एल. पारधी यांनी बांगड्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले.
उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण देण्यात आले. या बांगड्यांना बाजारात १५ ते ५०० रुपये दर मिळतो. दहा दिवसीय प्रशिक्षणाची जबाबदारी श्रीमती फुलनदेवी पारधी रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्था बालाघाटने हे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणार्थ्यांना बांगड्या बनविण्याचा साचा, कच्चे साहित्य व अन्य उपयोगी साहित्य पुरवठा केले. सोबतच तयार करण्यात आलेल्या बांगड्यांसाठी मार्केट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे.
एका दिवसात ३०० ते ५०० रुपयांची कमाई या व्यवसायातून करता येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला कोका क्षेत्र सहाय्यक डब्लू. आर. खान, वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे, मुख्याध्यापक कमलेश पारधी, संस्थेचे सी.एल. पारधी, नारायण गौतम, विनोद हनवत, माटोरा ग्रामवन समितीचे अध्यक्ष वैशाली शेंडे, भंडारा क्षेत्र सहाय्यक गौरी नेवारे, ग्रामवन समिती अध्यक्ष वाल्मीक गोबाडे, माटोरा वनरक्षक टी.एम. घुले, कोका वनरक्षक विपीन डोंगरे सोबतच माटोरा व कोका येथील समिती सदस्य तथा पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)