या ५ हानिकारक धातूंपासून तयार केलं जातं लिपस्टिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 11:57 AM2018-07-24T11:57:27+5:302018-07-24T11:58:14+5:30
महिलांचं सौंदर्य वाढणारं लिपस्टिक महिलांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतं. कारण हे तयार करण्यासाठी अनेक हानिकारक धातूंचा वापर केला जातो. चला जाणून घेऊया कशापासून तयार केलं जातं.
(Image Credit: sleepsugar.com)
महिला त्यांच्या सुंदरतेत भर घालण्यासाठी वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. त्यात लिपस्टिक हे जास्त महत्वाचं मानलं जातं. पण आता हेच महिलांचं सौंदर्य वाढणारं लिपस्टिक महिलांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतं. कारण हे तयार करण्यासाठी अनेक हानिकारक धातूंचा वापर केला जातो. चला जाणून घेऊया कशापासून तयार केलं जातं.
एका शोधानुसार, अनेक ब्रॅन्डेड लिपस्टिक आणि लिप ग्लॉसमध्ये हानिकारक धातू आढळले आहेत. अमेरिकेतील वेगवेगळ्या ३२ ब्रॅन्डतच्या परीक्षणानंतर ही बाब समोर आली आहे. यात शिसे, कॅडियम, क्रोमियम, अॅल्यूमिनिअम आणि इतरही काही धातू वापरण्यात आले आहेत.
काय म्हणतो शोध?
अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या पब्लिक हेल्थ ऑफ बार्कले स्कूलच्या काही संशोधकांनी प्रमुख ब्रॅन्डच्या लिपस्टिकवर अभ्यास केला. यातील काही धातू असे आहेत जे जीवघेण्या आजारांना निमंत्रण देतात.
शिसे
जवळपास सर्वच कंपन्यांच्या लिपस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात लेड आढळलं आहे. लेड या रसायनामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. जर स्थिती गंभीर झाली जर कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो. इतकेच नाहीतर यामुळे महिलांची स्मरणशक्ती कमी होणे, आय क्यू कमी होणे, चिडचिड वाढणे अशा समस्या होतात.
क्रोमियम
ज्या महिला एकदा लिपस्टिक लावल्यावर ते पुन्हा पुन्हा ठिक करतात त्या महिलांना अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यांच्या पोटात रोज ८७ मिलि ग्रॅम लिपस्टिक जाते. जनरली वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिकमध्ये सर्वात जास्त क्रोमियम आढळतं ज्यामुळे पोटात ट्यूमर होण्याची शक्यता वर्तवली जाते. इतकेच नाही तर काही संशोधनातून हेही समोर आले आहे की, यामुळे कॅन्सरही होऊ शकतो.
अॅल्यूमिनियम
लिपस्टिकमध्ये आढळणारं अॅल्यूमिनिअम हे मानवी आरोग्यासाठी हानिकारक असतं. लिपस्टिकचा वापर ओठांची सुंदरता वाढवण्यासाठी केला जातो आणि हे लिपस्टिक तोंडातून थेट पोटात जातं. अमेरिकेतील नॅशनल केमिकल रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये झालेल्या संशोधनानुसार, अॅल्यूमिनियम पोटासाठी घातक आहे. अॅल्यूमिनियममुळे पोटांचे वेगवेगळे विकार वाढू शकतात.
कॅडमियम
किडनी किंवा मधुमेहाची समस्या असणाऱ्या महिलांनी कॅडमियमपासून सावध रहायला हवं. कारण हे किडनीमध्ये जमा होऊन याने वेगवेगळ्या समस्या अधिक वाढू शकतात. कॅडमियमच्या अधिक सेवनामुळे महिलांना स्तनांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. अमेरिकेतील असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्चच्या एका अभ्यासानुसार हे तथ्य समोर आलं आहे.
मॅग्नेशिअम
लिपस्टिकच्या अतिवापरामुळे अॅल्यूमिनियम, कॅडमियम आणि शिसे यांच्यासहीत शरीरात मॅग्नेशिअमही शरीरात अधिक जातं. मॅग्नेशिअम अधिक प्रमाणात पोटात गेल्याने स्नायूंचे त्रास होऊ लागतात.
जीवघेणं लिपस्टिक
प्रसिद्ध संशोधक आणि पर्यावरण स्वास्थ्य विज्ञानाचे प्राध्यापक एस कॅथरीन हामंड यांनी सांगितले की, हे धातू लिपस्टिक किंवा लिप ग्लोमध्ये आढळणं यासाठीही हानिकारक आहे कारण हे लिपस्टिक टिश्यूने कोरडं केलं जाऊ शकत नाही. रोज महिला २४ मिली ग्रॅम लिपस्टिक नकळत पोटात घेतात.