गटशेतीने बदलले शेतीचे अर्थकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:50 IST2017-10-16T00:50:51+5:302017-10-16T00:50:51+5:30
शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.

गटशेतीने बदलले शेतीचे अर्थकारण
बी.डी. सवडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला देव : शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.
पारंपरिक शेतीला फाटा देऊन जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांनी गटशेतीची कास धरली आहे. या प्रयोगाची सुरुवात २००० मध्ये झाली. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील शेतक-यांनी एकत्र येऊन ४५० एकरांत निर्यातक्षम केशर आंबा आणि ६५० हेक्टरवर मोसंबी फळबागेची लागवड केली. हा प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला. जिरडगावचा केशर आंबा थेट परदेशात निर्यात झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी फळबाग तज्ज्ञ गटशेतीचे प्रवर्तक डॉ. भगवानराव कापसे यांनी अकोलादेव, देळेगव्हाण, नांदखेडा या भागातील शेतक-यांना जिरडगावला नेले. यातून प्रेरणा घेऊन या भागातील शेतक-यांनी अॅग्रो इंडिया गटशेती संघाची स्थापना केली. त्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतक-यांचे गट तयार करून एका शेतक-याची गटप्रमुख म्हणून नियुक्ती केली. गटशेती करणारे शेतकरी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ लागले. माती परीक्षण करून पिकांना नेमके कोणते घटक, किती प्रमाणात द्यायचे, हवामानातील बदल याचे अचूक मार्गदर्शन शेतक-यांना गटाच्या माध्यमातून मिळू लागले.