‘रेकॉर्ड रूम’ ला आगीची झळ
By Admin | Updated: October 31, 2016 00:48 IST2016-10-31T00:44:45+5:302016-10-31T00:48:59+5:30
औरंगाबाद : शनिवारी फटाका बाजार आगीमध्ये बेचिराख झाला. या आगीची तीव्रता एवढी होती की जि. प. च्या संरक्षण भिंतीलगतचे विशाल वृक्षही यातून सुटले नाहीत.

‘रेकॉर्ड रूम’ ला आगीची झळ
औरंगाबाद : शनिवारी फटाका बाजार आगीमध्ये बेचिराख झाला. या आगीची तीव्रता एवढी होती की जि. प. च्या संरक्षण भिंतीलगतचे विशाल वृक्षही यातून सुटले नाहीत. आरोग्य विभागाला लागूनच १३७ क्रमांकासह फटाक्यांची अनेक दुकाने होती. बाजूलाच जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे दस्तावेज असलेली ‘रेकॉर्ड रूम’ आहे. आगीची धग आणखी थोडा वेळ राहिली असती, तर ‘रेकॉर्ड रूम’ला आग लागून पाच- सहा दशकांपासून जतन करण्यात आलेली महत्त्वाची कागदपत्रेही या आगीत भस्मसात झाली असती.
यासंदर्भात जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड सांगत होते की, सकाळी ११.३० वाजेची वेळ असावी. घाटीजवळ असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालपासून ते शासकीय वाहनात बसून जि. प. मुख्यालयाकडे निघाले. अंजली सिनेमागृहाजवळ त्यांचे वाहन आले त्यावेळी ते मोबाईलवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडून प्रशिक्षणाबद्दलची माहिती जाणून घेत होते. त्यावेळी त्यांना फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्यासारखा आवाज आला. मात्र, आवाज थांबेना. ते जि. प. मुख्यालयाजवळ पोहोचले तरी फटाक्यांचा आवाज सुरूच होता. त्यामुळे त्यांनी आपल्या चालकास त्याबद्दल विचारणा केली. तेव्हा चालकाने सांगितले की, साहेब जि. प. मैदानावर थाटण्यात आलेल्या फटाका बाजाराला आग लागली आहे. त्यांनी तात्काळ आरोग्य विभागामागे असलेल्या ‘रेकॉर्ड रूम’कडे अधिकाऱ्यांसोबत जाऊन पाहणी केली. बाजूला असलेल्या वृक्षाला आगीची झळ बसली होती. झाडाची मोठी फांदी पेटली होती.
संरक्षण भिंतीला लागून असलेली फटाक्यांची सर्व दुकाने आगीच्या कवेत होती. सुदैवाने अग्निशामक दल व शहरातील टँकरचालकांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘रेकॉर्ड रूम’ पर्यंत आगीची धग पोहोचली नाही.