वाळूज येथे लिंक रोडवर कंटेनर दुचाकीचा अपघात, महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 13:43 IST2017-11-21T13:38:42+5:302017-11-21T13:43:01+5:30
वाळूज येथील औरंगाबाद - नगर रोडवर वळण घेताना दुचाकीचे हँडल कंटेनरच्या चाकात अडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला.

वाळूज येथे लिंक रोडवर कंटेनर दुचाकीचा अपघात, महिला जागीच ठार
औरंगाबाद : वाळूज येथील औरंगाबाद - नगर रोडवर वळण घेताना दुचाकीचे हँडल कंटेनरच्या चाकात अडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. संगीता सोनवणे असे मृत महिलेचे नाव असून राजू सोनवणे यात जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू सोनवणे व त्यांच्या पत्नी संगीता हे देवळाई येथील रहिवासी आहेत. आज सकाळी ते दोघे दुचाकीवरून (एमएच 20 डीए 7222 ) वाळूज येथील लिंक रोडवरून प्रवास करत होते. या दरम्यान वळण घेत असताना सोनवणे यांच्या दुचाकीचे हँडल त्याच मार्गावरून जाणा-या कंटेनरच्या (एनएल 08 टी 6292) चाकात अडकले. यामुळे सोनवणे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यातच संगीता या कंटेनरच्या चाकाखाली आल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सोनवणे हे सुद्धा कंटेनर खाली आले परंतु, त्यांना वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ढवळे व पोलीस कॉन्स्टेबल कादरी यांनी वेळीच बाहेर काढले. यामुळे त्यांचे प्राण वाचले.