भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयावर आज पेन्शनधारकांचा मोर्चा
By Admin | Updated: July 10, 2017 19:48 IST2017-07-10T19:48:58+5:302017-07-10T19:48:58+5:30
अकोला : अन्यायाविरोधात ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेच्यावतीने ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयावर आज पेन्शनधारकांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्थानिक भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयात पेन्शनसाठी जाणाऱ्या ईपीएस ९५ वर्गवारीतील पेन्शनधारकांना सदर कार्यालयातील गलथान कारभारामुळे मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेच्यावतीने ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
अकोल्यातील भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयात वृद्ध पेन्शनधारकांना मागील दोन महिन्यांपासून सन २०१६-२०१७ चे हयातीचे ई-जीवन प्रमाणपत्र सादर करूनही पेन्शन देण्यात येत नाही. त्यांना बाहेरगावावरून बोलावून रांगेत चार ते पाच तास थांबावे लागते. त्यानंतर घरी परत आल्यानंतर जीवन प्रमाणपत्र यशस्वीरीत्या लिंक झाले नसल्याचा मेसेज येतो. याबाबत विचारले असता योग्य उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे पेन्शनधारक संतप्त झाले असून, त्यांच्या मागण्यांसाठी ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात ११ जुलै रोजी अशोक वाटिकेजवळून सकाळी ११ वाजता भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. तरी सर्व ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कमांडर राऊत यांनी केले आहे.