निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा

By रवी दामोदर | Published: May 15, 2024 08:03 PM2024-05-15T20:03:30+5:302024-05-15T20:03:45+5:30

नोडल अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांची बैठक : प्रत्येक कार्यवाही नियोजनपूर्वक पार पाडण्याचे निर्देश

election decision officers reviewed the preparations for the counting of votes | निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा

अकोला: लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी एमआयडीसी फेज-४ परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतमोजणीच्या अनुषंगाने नोडल अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांची बैठक कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड व सर्व नोडल अधिकारी तसेच सहायक अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार म्हणाले की, संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन, सनियंत्रण व अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येकाने आपापली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. निवडणूक कामात कुठेही दिरंगाई होता कामा नये. तसे कुठे आढळल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल. टेबलवरील प्रत्यक्ष मतमोजणी, टपाली मतपत्रिका, व्हीव्हीपॅट स्लीप मोजणी, ईटीपीबीएस आदी सर्व बाबींचे प्रशिक्षण संबंधितांना द्यावे. आवश्यक तो सराव करून प्रत्येक कार्यवाही विहितपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मतमोजणी स्थळी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था
मतमोजणी केंद्र व परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश कुंभार यांनी दिले. केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाही. तपासणी काटेकोरपणे व्हावी व त्यासाठी चोख बंदोबस्त असावा, असे आदेश कुंभार यांनी दिले. मतमोजणी केंद्रात पोलिस बंदोबस्त, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृहे, पार्किंग, आदल्या दिवशी मुक्कामी राहण्याची आवश्यकता असलेल्यांना निवास व्यवस्था आदी बाबी सुसज्ज करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Web Title: election decision officers reviewed the preparations for the counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.