राळेगणमध्ये सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना गावबंदी; तरुणांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:17 IST2018-03-28T13:02:46+5:302018-03-28T13:17:22+5:30
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उद्यापासून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना गावबंदी करण्यात येणार असून, गावातील तरुणांना आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राळेगणमध्ये सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना गावबंदी; तरुणांचा आत्मदहनाचा इशारा
राळेगणसिद्धी : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उद्यापासून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना गावबंदी करण्यात येणार असून, गावातील तरुणांना आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप अण्णांचे उपोषण सोडविण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीत बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सभा घेण्यात आली. या सभेत मोदी सरकारवर ग्रामस्थांनी तीव्र शब्दात टीका करीत उद्यापासून गावात कोणत्याच सरकारी यंत्रणेला प्रवेश द्यायचा नाही, असा ठराव घेण्यात आला. तसेच तरुणांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला असून, गावात पोलिसांनाही येऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. महिलांसह ग्रामस्थांनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्धार केला.
दरम्यान अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेष औटी व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर हावळे, रमेश औटी, नंदकुमार मापारी, तुकाराम क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ते उपोषण आज मागे घेण्यात आले. लाभेष औटी यांनी आपल्या मातोश्री जनाबाई औटी व जेष्ठ महिला तोलाबाई पठारे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके, पंचायत सभापती राहूल झावरे, उपसभापती दीपक पवार, दादासाहेब पठारे, माजी सरपंच जयसिंगराव मापारी, उपसरपंच लाभेश औटी, सोन्याबापू भापकर, रमेश औटी, विलास औटी, शंकर नगरे, मंगल मापारी आदी उपस्थित होते.